देस्पांगचा प्रदेश आधीच गमावला, दौलत बेग ओल्डीही जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:17 AM2021-03-04T05:17:21+5:302021-03-04T05:17:38+5:30
राहुल गांधी; मोदी सरकार चीनपुढे झुकल्याची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लडाखमधील देस्पांग हा प्रदेश भारताने गमावलाच व आता तेथील दौलत बेग ओल्डी हा भूभागही आपल्या हातातून जाण्याची शक्यता आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
पूर्व लडाखच्या सीमेवरून आपापले सैन्य मागे घ्यावे, यासाठी भारत व चीनने नुकताच एक करार केला. भारताने हा करार करताना
कोणताही भूभाग गमावलेला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.
त्या पार्श्वभूमीवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकार भ्याड असून, त्याच्या भूमिकेमुळे भविष्यात मोठा पेचप्रसंग निर्माण होणार आहे. लडाखमधील देस्पांग हा प्रदेश भारताच्या हातातून गेला आहे. आता दौलत बेग ओल्डी या भूभागावरही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैन्याने घुसखोरीचा केलेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनांनंतर भारत व चीनच्या लष्कराने पूर्व लडाखच्या सीमेवर आणखी कुमक वाढविली होती.
इतर मुद्द्यांवरही चर्चा सुरू
भारत व चीनमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या व सैन्य मागे घेण्यासाठी करार करण्यात आला. आता दोन्ही देशांत मतभेदांच्या इतर मुद्द्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे.