नाशिक : १४ जुलै २०१५ रोजी झालेल्या धर्मध्वजारोहण सोहळ्याला ज्या नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता तशी उपस्थिती ध्वजावतरण सोहळ्यात दिसून आली नाही. नाशिककरांचा निरुत्साह आणि रेंगाळलेल्या सोहळ्याने कुंभपर्वाची सांगता झाली.सिंहस्थ कुंभपर्वाचा शुभारंभ थाटामाटात करण्यात आला होता. त्यावेळी शोभायात्रेसह गोदावरी पटांगणावर झालेल्या समारंभाला नाशिककरांनी प्रचंड गर्दी केली होती. संपूर्ण गोदाघाट परिसर नाशिककरांच्या गर्दीने फुलून गेला होता. नाशिककरांमध्ये त्यावेळी उत्साह ओसंडून वाहत होता. रस्त्यांवर रांगोळ्या काढत शोभायात्रेचे स्वागत झाले होते. शुभारंभाचा थाट ध्वजावतरण सोहळ्यातही करण्याचे नियोजन पुरोहित संघाने केले होते. त्यासाठी नाणीज पीठाचे नरेंद्र महाराज यांच्यासह मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे ध्वजावतरण सोहळाही दिमाखात पार पडेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु प्रत्यक्षात चार दिवसांपूर्वीच पुरोहित संघाने पावसाचे कारण दर्शवित शोभायात्रा रद्द केली. त्यानंतर गुरुवारी सांगता सोहळ्यालाही नाशिककरांची गर्दी दिसून आली नाही. कपालेश्वर मंदिरासमोरील पटांगणही नागरिकांच्या गर्दीने भरले नव्हते. ध्वजावतरण सोहळ्याला नाशिककरांचा निरुत्साह दिसून आला. नागरिकांची गर्दी कमी असताना सोहळ्याचे नियोजनही त्याप्रमाणेच आटोपते घेणे अपेक्षित होते. परंतु भरमसाट सत्कारामुळे कार्यक्रमही रेंगाळला. सत्काराचा कार्यक्रमही विस्कळीत झाला. जो येईल त्याचे नाव प्रशस्तिपत्रकावर घाईघाईने टाकून देत सत्काराचा कार्यक्रम उरकला जात होता. त्यातच व्यासपीठावरील मान्यवरांचेही उशिराने आगमन होत राहिल्याने सोहळ्याची रयाच गेली. केवळ औपचारिकता पार पाडण्याचेच काम नंतर पुरोहित संघाकडून करण्यात आले.
नाशिककरांचा निरुत्साह, रेंगाळलेला सोहळा ध्वजावतरण : सत्कारामुळे कार्यक्रम लांबला
By admin | Published: August 12, 2016 12:05 AM