चेन्नई :
तामिळनाडूमधील अरक्कोनम येथील मंडिअम्मन मंदिरात रविवारी सायंकाळी उत्सवादरम्यान क्रेन कोसळून ४ भाविक ठार झाले, तर ९ जण जखमी झाले आहेत. क्रेनवर बसून देवाला पुष्पहार अर्पण करतानाच हा अपघात घडला. क्रेन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे उत्सवात क्रेनचा वापर करण्यास परवानगी नव्हती.
अरक्कोनम येथील मंडिअम्मन मंदिरात मायलेरू उत्सव सुरू होता. यावेळी क्रेनला लटकून तिघेजण देवाच्या मूर्तीला हार घालत होते. त्यानंतर क्रेनचे नियंत्रण बिघडले आणि ती खाली पडली. या अपघाताचा व्हिडीओही समोर आला असून त्यात अनेक लोक क्रेनला लटकलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात पुष्पहार आहेत, आणि मूर्तींना ते अर्पण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दरम्यान, नियंत्रण सुटल्याने क्रेन खाली पडली. अपघातानंतर मंदिरात चेंगराचेंगरी झाली. काही लोकांनी क्रेनखाली दबलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.