अजबच! 'या' राज्यातील जनतेचा कौल भाजपला; पण मुख्यमंत्रिपदी हवाय काँग्रेस नेता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 08:54 AM2021-11-13T08:54:00+5:302021-11-13T08:56:09+5:30
काँग्रेस-भाजपमध्ये अटीतटीची लढत; मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्याला सर्वाधिक पसंती
देहरादून: पुढील वर्षी ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पुढील वर्षी होणारी निवडणूक २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटरनं एक सर्वेक्षण केलं आहे. त्याआधारे मतदारांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. गेल्या वर्षभरात राज्यानं तीन मुख्यमंत्री पाहिले आहेत. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागा आहेत. बहुमतासाठी ३६ जागा जिंकण्याची गरज आहे. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, भाजपला ३६ ते ४० जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ३० ते ३४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला ० ते २ जागा मिळू शकतात.
उत्तराखंडमध्ये भाजपला ४१ टक्के मतदान होईल असा अंदाज आहे. तर काँग्रेसला ३६ टक्के मतं मिळू शकतात. याशिवाय आपला १२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. अन्य पक्ष आणि उमेदवारांना ११ टक्के मतं मिळू शकतील.
मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला पसंती?
गेल्या वर्षभरात उत्तराखंडनं तीन मुख्यमंत्री पाहिले. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप नेतृत्त्वानं सरकारचा चेहरा बदलला. विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनीच पदावर कायम राहावं, असं २८ टक्के जणांना वाटतं. तर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं ३१ टक्के जनतेला वाटतं. तर अनिल बलुनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा जावी, असं १८ टक्के लोकांना वाटतं.