चंदीगड - दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी हरयाणात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचे पद्मावती हे मूळ नाव बदलल्यानंतरही या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडचणी दूर झालेल्या नाहीत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याचे कारण देऊन हरयाणा सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.
करणी सेनेची सरकारला उघड धमकी पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये ठरलेला तडजोडीचा फॉर्म्युला करणी सेनेने फेटाळून लावला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याच्या आपल्या मागणीवर करणी सेना ठाम आहे. करणी सेनेने सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला इशारा दिला आहे. पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच करणी सेनेने दिली आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटात काही बदल करण्यात येणार आहेत पण करणी सेनेला हे बदल मान्य नाहीत. या चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जे काही होईल त्याला भाजपा सरकार आणि सेन्सॉर बोर्ड जबाबदार असेल अशी उघड धमकी करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी दिली आहे. चित्रपट सुरु होण्याआधी एक डिस्केलमर दिसेल. त्यावर चित्रपट काल्पनिक असल्याचा संदेश असेल. संजय लीला भन्साळींचा चित्रपट जसा काल्पनिक आहे तसेच आम्ही चित्रपटगृहात जेव्हा फुले उधळू ते सुद्धा काल्पनिकच असेल असे सुखदेव सिंह गोगामेडी म्हणाले.