अंबिका प्रसाद कानुनगो लोकमत न्यूज नेटवर्कभुवनेश्वर : ओडिशात भरपूर सुपीक जमीन, खनिज संसाधने आणि किनारी भाग असूनही राज्य सरकारने लागू केलेल्या धोरणांमुळे तेथील लोक गरिबीशी झगडत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यातील बीजेडी सरकारवर टीका केली. त्यांनी ओडिशातील ७० वर्षांवरील वृद्धांसाठी ५ लाख रुपयांचे मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले.
बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातील कनिसी येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज ६ मे आहे. ६ जूनपर्यंत भाजपने नियुक्त केलेला मुख्यमंत्री होईल आणि १० जूनला शपथविधी सोहळा होईल. भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी येथे आलो आहे. काँग्रेस पक्षावर टीका करताना मोदी म्हणाले की, केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी न केल्याबद्दल बीजेडी सरकारवर त्यांनी टीका केली. आयुष्मान भारत योजनेचा देशभरात ६ कोटी लोकांना फायदा झाला आहे; परंतु, बीजेडीच्या दुर्लक्षामुळे येथील लोक या योजनेला मुकले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हिंजली मतदारसंघातील हजारो मजूर इतर राज्यांत का स्थलांतरित होत आहेत, असा सवालही माेदींनी केला.
ओडिशाला काय मिळाले?काँग्रेसने ५० वर्षे राज्य केले, त्यानंतर बीजेडीचे सरकार २५ वर्षे चालले. पण, काय झाले? मुबलक पाणी, सुपीक जमीन, मौल्यवान खनिजांचा खजिना, बेरहामपूर सारखी व्यापार केंद्रे, सिल्क सिटी आणि अन्नधान्याची राजधानीदेखील आहे. पण, ओडिशातील लोक गरीब राहिले, अशी टीका माेदी यांनी केली.
ते तर भाजपचे दिवास्वप्न; पटनाईक यांचे प्रत्युत्तरओडिशात भाजप सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहे; पण ते दिवास्वप्न आहे, असे प्रत्युत्तर ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांनी केली. ‘भाजप अनेक दिवसांपासून दिवास्वप्न पाहत आहे,’ असे पटनाईक यांनी यावेळी भाजपच्या दाव्यांवर उत्तर देताना सांगितले.