एफ १६ हे पाकिस्तानचे आधुनिक विमान आहे. या विमानाच्या तुलनेत भारतीय मिग-२१ बायसन ही विमाने तंत्रज्ञानाने तुलनेने कमी असतानाही विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी अतिशय कौशल्याने विमान चालवून एफ-१६ विमानाचा पाठलाग करत ते पाडले. दोन विमानांची लढाई कशी होते, हवेतच लक्ष्याचा वेध कसा घेतला जातो? याबाबत ग्रुप कॅप्टन भालचंद्र लद्दे (निवृत्त) यांनी केलेले शंका समाधान.पाकिस्तानचे एफ १६ हे विमान मिगच्या तुलनेत सरस असतानाही भारतीय वैमानिकांनी पाडले. या दोन्ही विमानांच्या वैशिष्ट्यांबाबत काय सांगाल?ग्रुप कॅप्टन भालचंद्र लद्दे (नि.) : भारताचे मिग २१ बायसन यात अनेक बदल करण्यात आले आहे. या विमानाच्या तुलनेत एफ-१६ हे अनेक बाबतीत आधुनिक आहे. या विनामात असलेल्या विमानविरोधी यंत्रणा, क्षेपणास्त्रे ही लांब पल्ल्याची आहे. तसेच उडण्याची क्षमता ही अतिउच्च दर्जाची आहे. मात्र, भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी अतिशय धाडसाने आणि कौशल्याने बायसन विमान चालवून एफ-१६ विमान खाली पाडले.
भारतीय हद्दीत घुसलेल्या विमानांची माहिती कशी मिळते. त्यावर कशा पद्धतीने अॅक्शन घेतली जाते?ग्रुप कॅप्टन भालचंद्र लद्दे (नि.) : भारतीय हवाई दलाकडे शत्रुंच्या विमानावर लक्ष ठेवण्यासाठी एअर डिफेन्स यंत्रणा आहे. यात उच्च क्षमतेची रडार यंत्रणा असते. या द्वारे भारतीय हद्दीत घुसलेली शत्रुची विमाने ही त्वरित ओळखली जातात. या द्वारे अर्ली वॉर्निंग मिळते. भारतीय हद्दीत घुसण्याच्या आत ती ओळखली जातात. प्रत्येक विमानतळावर अशा परिस्थितीसाठी काही विमाने ही शस्त्रसज्ज असतात. काही मिनिटांत ती उड्डाणे घेऊन शत्रूची विमाने पाडू शकतात. या बरोबरच पेट्रोलिंग करणारी काही विमाने ही हवेतच असतात. त्याचबरोबर जमिनीवरूनही मॉनिटर करणारी यंत्रणा असते. त्याद्वारे शत्रूची विमाने ही पाडली जातात.
पाकिस्तामधील दहशतवादी तळांवर २५० किलोचे बॉम्ब भारतीय वैमानिकांनी टाकले. या बॉम्बची मारक क्षमता केवढी असते?ग्रुप कॅप्टन भालचंद्र लद्दे (नि.) : भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी वापरलेले बॉम्ब मोठे होते. हजार किलोचे बॉम्ब आपण दहशतवाद्यांच्या तळावर टाकले. हे बॉम्ब लेझर गायडेड असल्यामुळे ते लक्ष्याचा अचूक वेध घेतात. यात मोठी स्फोटके असल्याने आजुबाजुच्या परिसरातील सर्वच गोष्टी उद्ध्वस्त करतात.
विमानातून पडलेल्या बॉम्ब यांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला की नाही हे कसे कळते, याची खातरजमा कशी केली जाते?ग्रुप कॅप्टन भालचंद्र लद्दे (नि.) : आजकालच्या विमानामध्ये तसेच क्षेपणास्त्रामध्ये लक्ष्याचा वेध घेण्यापर्यंत छायाचित्रण करण्याची क्षमता असते किंवा एक विमान लक्ष्यावर बॉम्बद्वारे मारा करतात. त्या विमानामागून येणारे दुसरे विमान हे लक्ष्य किती उद्ध्वस्त झाले याचे छायाचित्रण करत असते. याचबरोबर ड्रोन किंवा उपग्रहाच्या साह्याने किती नुकसान झाले याची माहिती घेतली जाते.
विमानांची लढाई कशी असते? भारतीय विमानांनी पाकच्या एफ-१६ या विमानांवर किती लांबून मारा केला असावा?दोन विमानांमध्ये होणाऱ्या लढाईला ‘डॉग फाईट’ म्हणात. रडारवरून दुसऱ्या विमानाची माहिती मिळताच आपली विमाने अवकाशात झेपावतात. शत्रूची विमाने पाडण्यासाठी तसेच त्यांचा वेध घेण्यासाठी विमानातही रडार यंत्रणा असते. या यंत्राची मदत घेत वैमानिक आपल्या कौशल्याचा वापर करत शत्रूची विमाने पाडण्यासाठी क्षेपणास्त्रे, मशिनगन यांचा वापर करतात.