भोपाळ/जयपूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. कैलाश विजयवर्गीय ते प्रल्हाद पटेल, नरेंद्रसिंह तोमर ते व्ही. डी. शर्मा यांनी दिल्लीत मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. ‘मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार नाही,’ असे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत ग्वाल्हेरमध्ये तोमर यांचे ‘बॉस’ म्हणून पोस्टर लावण्यात आले आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय विधिमंडळ बैठकीनंतर घेतला जाईल, आमदार आपापल्या मतदारसंघात असून, बैठकीसाठी जयपूरला येतील, असे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी म्हणाले.
...अन् आमदारांना आणले कार्यालयात: राजस्थानात पाच आमदार रिसॉर्टमध्ये?
भाजपचे पाच आमदार मंगळवारी जयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये एकत्र राहिल्यामुळे ‘लॉबिंग’ची अटकळ सुरू झाली. मात्र, सी. पी. जोशी यांनी अशी कोणतीही शक्यता फेटाळून लावली. कोटा विभागातील आमदारांनी मंगळवारी रात्री सीकर रोडवरील एका रिसॉर्टमध्ये ‘चेक इन’ केले. त्यापैकी एक, ललित मीना (किशनगंज) यांना शंका आली की, त्यांना रिसॉर्टमध्ये अडकवून ठेवण्यात येत आहे. त्यांनी वडील हेमराज मीना यांना ही माहिती दिली. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवण्यात आले. पक्षाचे काही नेते ‘रिसॉर्ट’वर पोहोचले आणि आमदारांना कार्यालयात आणण्यात आले.
मुख्यमंत्री निवडीला विलंब; कॉंग्रेसची टीकामध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमधील मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेस होत असलेल्या विलंबावरून काँग्रेसने गुरुवारी भाजपला चिमटा काढला. निवडणूक निकालाला चार दिवस उलटूनही भाजपला या राज्यांतील मुख्यमंत्री ठरवता आलेले नाहीत, असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले