झज्जर: हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात शेतकरी आणि पोलीसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी शेतकरी पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम दुपारी 1.30 पासून आहे, परंतु शेतकरी सकाळपासूनच या ठिकणी दाखल झाले. यादरम्यान, पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली, यानंतर झज्जर पोलिसांनी शेतकऱ्यांवर पाण्याच्या तोफांचा मारा केला.
उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी शेतकरी हातात काळे झेंडे घेऊन पोहोचले होत. या दरम्यान पोलीसांनी शेतकऱ्यांना रोखले असता शेतकरी आक्रमक झाले. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स शेतकऱ्यांनी काढून टाकले. शेतकऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस सातत्याने वॉटर कॅननचा वापर करत आहेत. उपमुख्यमंत्री दुपारी 1.30 च्या सुमारास झज्जरला पोहोचतील. सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे. अजूनही 150 पेक्षा जास्त शेतकरी कार्यक्रम स्थळापासून थोड्या अंतरावर उपस्थित आहेत.
दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या झज्जर जिल्ह्याचे डीसी श्यामलाल पुनिया यांनी शेतकऱ्यांना लोकशाही पद्धतीने विरोध करण्याचे आवाहन केले. तसेच, आम्हीदेखील तुमच्याप्रमाणे शेतकऱ्यांची मुले आहोत आणि सध्या सरकारी कर्तव्य बजावत आहोत. त्यामुळे, आमच्या कर्तव्यात अडथळा आणू नका. कार्यक्रम स्थळापासून दूर राहून निषेध, दिलेली सीमा ओलांडू नका, अस ते म्हणाले.