काँग्रेसनं कोणकोणती सरकारं अस्थिर केली? पंतप्रधान मोदींनी लांबलचक यादीच वाचली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 01:02 PM2022-02-08T13:02:08+5:302022-02-08T13:05:53+5:30
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसचा समाचार घेतला आहे. संघराज्याबद्दल घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार सांगत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. सरकारं अस्थिर करणं हेच काँग्रेसचं धोरण आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना १०० वेळा लोकनियुक्त सरकारं बरखास्त करण्यात आली. मग काँग्रेसचे नेते कोणत्या तोंडानं संघराज्याची भाषा करतात, असा थेट सवाल मोदींनी उपस्थित केला.
राज्यांमधील ५० सरकारं बरखास्त करण्यात आली, लोकनियुक्त सरकार पाडण्यात आली, तेव्हा देशाचं पंतप्रधान कोण होतं, असा प्रश्न मोदींनी राज्यसभेत विचारला. सरकार अस्थिर करणं हेच त्यांचं धोरण होतं आणि आता त्याचीच शिक्षा त्यांना मिळत आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला.
काँग्रेस काळात बरखास्त करण्यात आलेल्या राज्यांची यादीच मोदींनी वाचून दाखवली. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांचं सरकार बरखास्त केलं गेलं. तामिळनाडूतील करुणानिधींचं सरकार पाडलं. आंध्र प्रदेशमधलं एनटीआर सरकार बरखास्त केलं. कर्नाटकातलं बोम्मई यांचं सरकार पाडलं. विमानतळावर स्वागत व्यवस्थित झालं नाही, म्हणून त्याकाळी मुख्यमंत्री बदलले जात होते, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली.