नवी दिल्ली - पाकिस्तान वारंवार त्यांच्याकडे असलेल्या अणवस्त्रांची धमकी भारताला देत असतो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला आहे. केंद्र सरकारने आणखी एका सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला तर, पाकिस्तानात घुसून त्यांचे अण्वस्त्र तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे असे धानोआ यांनी सांगितले. मागच्या महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी अमेरिकेमध्ये असताना भारताला अणवस्त्राचा वापर करण्याची धमकी दिली होती.
भारताच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन' रणनितीचा सामना करण्यासाठी आम्ही छोटया पल्ल्याची अण्वस्त्रे विकसित केली आहेत असे त्यांनी सांगितले होते. पाकिस्तानच्या न्यूक्लियर कमांड ऑथोरीटीकडे पाकिस्तानच्या अणवस्त्र साठयाचे नियंत्रण असून, प्रसंगी वापर करण्याचे अधिकारही एनसीएकडे असल्याचे अब्बासी यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर धानोआ यांनी व्यक्त केलेले मत महत्वपूर्ण ठरते. पाकिस्तानातील अणवस्त्राचे तळ शोधून तिथे हल्ला करण्याची आमची क्षमता असे त्यांनी सांगितले. उद्या होणा-या एअरफोर्स डे च्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारतीय हवाई दल चीनचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असून, एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवरील लढाईसाठी पूर्णपणे सज्ज आहे असे बी.एस.धानोआ यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईकसारख्या ऑपरेशनमध्ये हवाई दलाला सहभागी करुन घ्यायचे कि, नाही तो निर्णय सर्वस्वी सरकारचा आहे असे ते म्हणाले.