रायबरेली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आपल्याविरुद्ध ‘सूडाचे राजकारण’ करीत असल्याचा आरोप केल्यानंतर गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही मोदी सरकारला लक्ष्य केले. आपल्या रायबरेली या मतदारसंघाबद्दल केंद्राची भूमिका उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला.सोनिया गांधी सकाळी रायबरेलीच्या एकदिवसीय दौऱ्यावर पोहोचल्या. जिल्हा दक्षता व देखरेख समितीच्या बैठकीत त्यांनी भाग घेतला. या बैठकीत रायबरेली मतदारसंघाबद्दल केंद्र सरकारच्या कथित उदासीन भूमिकेवर चर्चा झाली. यावेळी केंद्राच्या उदासीन भूमिकेविरुद्ध एक ठराव पारित करण्यात आला. याउलट उत्तर प्रदेशच्या अखिलेश यादव सरकारने रायबरेलीच्या शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीसाठी आभार व्यक्त करण्यात आले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलण्यास सोनियांनी नकार दिला. तथापि बैठकीला उपस्थित असलेले सपा नेते आणि अखिलेश सरकारमधील मंत्री मनोजकुमार पांडे यांनी बैठकीत ठराव पारित झाल्याचे सांगितले. केंद्रपुरस्कृत योजना आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रायबरेलीला मिळणाऱ्या निधीत मोठी कपात करण्यात आली आहे, यावरून रायबरेलीबद्दल केंद्राची उदासीन भूमिका स्पष्ट होते,असे ते म्हणाले. याविरोधात मी ठराव मांडला आणि सोनियांनी तो वाचला. हा ठराव नंतर पारित झाला, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)४जिल्हा दक्षता व देखरेख समितीच्या बैठकीनंतर सोनिया थेट अतिथीगृहाकडे रवाना झाल्या. येथे त्या बछरावा रेल्वे अपघातातील पीडितांना भेटल्या. या अपघातात ३० लोक ठार झाले होते. मृतांच्या कुटुंबियांनी त्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला.
रायबरेलीस केंद्राची सापत्न वागणूक
By admin | Published: May 28, 2015 11:55 PM