डिस्कवरी चॅनेलचा तोतया संचालक अटकेत
By admin | Published: April 04, 2015 1:54 AM
मनालीतून अटक : मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि गोव्यामध्ये गुन्हे दाखल
मनालीतून अटक : मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि गोव्यामध्ये गुन्हे दाखलमुंबई : डिस्कवरी चॅनेलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर असल्याची बतावणी करून भाडेतत्त्वावर महागडे कॅमेरे देणार्यांची फसवणूक करणार्या महाठगाला मनाली येथून अटक करण्यात आली आहे. मुळचा गुजरातचा असलेल्या मिलिंद भरतकुमार भट (२७) याच्याविरोधात मुंबईसह, दिल्ली, गोवा, चेन्नई याठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सायन पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा ठग पोलिसांच्या हाती सापडला.भटने इंटरनेटच्या माध्यमातून मुंबईसह दिल्ली, चेन्नई आणि गोव्यामध्ये भाडेतत्त्वावर कॅमेरे देणार्यांचे पत्ते मिळवले. डिस्कवरी चॅनलसाठी जंगलात शूटिंग करण्याच्या बहाण्याने गेल्या दोन वर्षांपासून भट महागडे कॅमेरे भाड्याने घेत होता. १४ डिसेंबरला त्याने एका खासगी वृत्तवाहिनीसह, बोरिवलीतील एका व्यक्तिकडून तब्बल २१ लाख रुपये किमतीचे कॅमेरे भाडेतत्त्वावर घेऊन ते परस्पर विकले. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला भटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मास मीडियाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या ठगाने एका तरुणीशी प्रेमविवाह केला. पत्नीला घेऊन वेगळे राहण्याच्या हापोटी कुंची कुर्वे टोळीकडून १० लाख रुपये उधार घेतले होते. ते परत करण्यासाठी भटने पहिल्यांदा भाडेतत्त्वावर कॅमेरे घेऊन एका जाहिरात कंपनीचे काम मिळवले. मात्र ते वेळेत पूर्ण न झाल्याने भाड्याचे कर्ज त्याच्या डोक्यावर झाले. हे कर्ज फेडण्यासाठी भटने हे कॅमेरे विकून पळ काढला. मात्र त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार न झाल्याने त्याने पैसे कमविण्यासाठी हाच मार्ग निवडला.........................................अशी केली अटक...वरिष्ठ निरीक्षक येशुदास गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मोठ्या शहरांमधील भाडेतत्त्वावर कॅमेरे देणार्यांशी संपर्क साधला. भटने गोवा येथील एका व्यक्तिकडून लाखो रुपयांचा कॅमेरा आणि लेन्स घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या व्यक्तीकडून भटचा नवीन क्रमांक मिळवल्यावर तो मनाली येथे असल्याचे पोलिसांना समजले. स्थानिकांंच्या आधारे शोध घेत या पथकाने मनालीमधून भटच्या मुसक्या आवळल्या. भटने एकट्या मुंबईत ६ जणांंची फसवणूक केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्याच्याजवळून दिल्ली, चेन्नई, सायन आणि बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून गुन्ह्यातील सुमारे १४ लाखांंचा ऐवज हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे. (प्रतिनिधी)