अहमदाबाद : नवरा आणि सासरच्या लोकांवर जरब निर्माण करण्याच्या उद्देशाने बनावट पोलीस बनलेल्या महिलेला अखेर बिंग फुटल्याने पोलीस ठाण्याची हवा खावी लागली.प्रियंका पटेल (२४) असे या महिलेचे नाव आहे. शाहपूरच्या हालिमनी खडकी येथे राहणाऱ्या प्रियंकाला पतीपेक्षा कुठल्याच बाबतीत कमी नाही, असा संदेश तिला खासगी कंपनीत काम करणाऱ्या पतीला द्यायचा होता. पुरुषी वर्चस्वाच्या संदर्भात पतीने केलेल्या वक्तव्यावरून प्रियंका कमालीची दु:खी झालेली होती. त्यामुळे पतीला नमविण्यासाठी तिने नामी शक्कल लढविली आणि बॉलिवूड स्टाईलचा अवलंब करीत बनावट पोलीस बनली.‘आता आपण साधी गृहिणी राहिलेलो नाही. रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) कॉन्स्टेबल म्हणून आपण भर्ती झालो आहोत,’ असे प्रियंकाने दहा दिवसांपूर्वी पती संजय व सासरच्यांना सांगितले. ती एवढ्यावरच थांबली नाही तर आपल्याला दररोज सकाळी कर्तव्यावर जायचे असल्याने कालुपूर रेल्वे स्थानकावर सोडून देत चला, असे तिने पतीला सांगितले. पत्नी नोकरीला लागली म्हणून पतीही तिला दररोज कालुपूर रेल्वे स्थानकावर सोडून देऊ लागला. प्रियंका सकाळी कामावर जायची आणि सायंकाळी एकटीच घरी परतायची. तिने आरपीएफचा गणवेष परिधान केल्याने सासरच्यांनी तिच्यावर संशय घेण्याला जागाच नव्हती. परंतु गेल्या बुधवारी सायंकाळी ती घरी परतताना दोन महिला पोलीस कॉन्स्टेबलशी तिची गाठ पडली. तू प्रशिक्षण कुठे घेतलेस, असा प्रश्न त्या दोघींनी विचारताच प्रियंका गडबडली. शेवटी प्रियंकाने वस्तुस्थिती सांगितली. (वृत्तसंस्था)आपण केवळ गृहिणी असून सासरी चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी नकली पोलीस बनलो, अशी कबुली तिने दिली. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात प्रियंका कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सामील नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तोतया महिला पोलीस अटकेत
By admin | Published: April 16, 2016 3:14 AM