ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २० - भारत व पाकिस्तान या उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या फुटीरतावाद्यांची सुटका करण्यात आली आहे. हुर्रियतचे कट्टरवादी नेते सैयद अली शाह गिलानी व मिरवैज उमर फारूख, यांना पोलिसांनी आज सकाळपासून नजकैदेत ठेवले होते तर यासिन मलिकला अटक करून कोठिबाग पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. अखेर दुपारच्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली.
येत्या २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक होणार असून पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज दिल्लीत येणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तान उच्चायोगाने मंगळवारी रात्री काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांना निमंत्रण देत कुरापत काढली आहे. फुटीरतावाद्यांचा मुद्दा उकरून काढत पाकने पुन्हा आडमुठेपणाची भूमिका घेतली आहे. दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या चर्चेत फुटीरतावाद्यांचा सहभाग असता कामा नये, ही भारताची भूमिका आहे. गेल्या वर्षीही भारत व पाकिस्तान यांच्यात दिल्लीत होणा-या परराष्ट्र सचिवांच्या पातळीवरील चर्चेदरम्यान पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी काश्मिरी फुटीरवाद्यांना भेटीसाठी बोलावून त्यांच्याशी सल्लामसलत केली होती. हे कृत्य पूर्णपणे अमान्य असल्याचे सांगत भारताने ती बैठक ऐनवेळी रद्द केली होती. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ठामपणे असे सांगितले होते, की तुम्ही एक तर आमच्याशी बोला किंवा फुटीरवाद्यांशी बोला, असे पाकिस्तानला ठणकावून आम्ही लाल रेषा आखली आहे. मात्र असे असतानाही यावर्षीही सरताज अझीज यांच्या भेटीच्या वेळीही पाकिस्तानने ही लाल रेषा ओलांडून फुटीरतावादी नेत्यांना निमंत्रण दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही नेत्यांना अटक करून पोलिस स्थानकात ठेवले तर काहींना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानच्या झेंडा फडकावणाऱ्या फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता.