आगरतळा- भारतीय जनता पार्टीने त्रिपुरामध्ये प्रथमच पहिल्यांदाच सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. ६० जागांपैकी ४० जागा जिंकत डाव्यांचा मोठा पराभव भाजपाने केला आहे. गेली २५ वर्षे डाव्यांचा हा बालेकिल्ला अभेद्य होता. तो हिसकावून घेतल्यामुळे भाजपाच्या विजयाची चर्चा देशभरात होत आहे. त्रिपुराचे आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.त्रिपुरामध्ये भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून विप्लव कुमार देव यांचं नाव पुढे येत आहे. ४८ वर्षिय देव हे त्रिपुराचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे देव दिल्लीमध्ये जिममध्ये व्यायाम शिकवण्याचे काम करत असत. विधानसभेच्या या निवडणुकीसाठी त्यांनी दारोदार फिरुन पक्षाचा प्रचार केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देवधर यांनी देव यांच्याबरोबर गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये त्रिपुरा राज्य पिंजून काढले. देवधर यांनी रा. स्व. संघाचे काम ईशान्य भारतात काम करत असताना मेघालयामध्ये आठ वर्षे वास्तव्य केले होते. देव आणि देवधर यांनी आदिवासी समुदायात भाजपाचा जनाधार वाढावा यासाठी प्रयत्न केले. त्रिपुराच्या एकूण लोकसंख्येपैकी ३२ टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. तसेच अनुसुचित जमातींसाठी ६० जागांपैकी २० जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
विप्लव देव यांच्याबाबत बोलताना भाजपाचे सरचिटणीस राम माधव म्हणाले, आम्हाला त्रिपुरामध्ये भाजपासाठी चांगला चेहरा हवा होता आणि विप्लवइतका दुसरा चांगला माणूस मिळणे शक्यच नव्हते. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी त्याला शाखेत लाठी चालविण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे.