सध्या संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव, तो रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन, त्यामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था, कोट्यवधींचे गेलेले रोजगार, पगारकपात अशी संकटांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे २०२० हे वर्षच चिंता वाढवणारं ठरलं. हे वर्ष संपण्यासाठी दोन महिने शिल्लक आहेत. मात्र तरीही संकटं काही संपणार नाहीत, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत भारतावर आणखी संकटं येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच पूर्ण हिमालय क्षेत्रात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवतील, असा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.हिमालयाच्या पर्वतरांगा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून देशाचा बचाव करतात. याशिवाय शत्रूंपासून देशाचं संरक्षण करण्यातही हिमालयाची मोठी भूमिका आहे. मात्र आता याच हिमालयामुळे देशावर संकट येण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांनी हिमालयातील पर्वतांच्या पृष्ठभागासह मातीचं परीक्षण आणि रेडिओकार्बन विश्लेषण केलं. भूवैद्यानिक, भौगोलिक माहितीच्या अभ्यासातून वैज्ञानिकांनी भूकंपाचा अंदाज वर्तवला आहे. याबद्दलचा अहवाल 'सिस्मोलॉजिकल रिसर्च लेटर्स जर्नल'मध्ये प्रकाशित झाला आहे.हिमालयीन पर्वतरांगा पूर्वेला भारत ते पश्चिमेला पाकिस्तानपर्यंत पसरलेल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण भागावर भूकंपाचा परिणाम दिसेल. याआधीही या भागात अनेक मोठ्या भूकंपांचा केंद्रबिंदू होता. वैज्ञानिकांचा अंदाज खरा ठरल्यास भारताच्या चंदिगढ, देहरादून आणि नेपाळच्या काठमांडूमध्ये प्रचंड मोठी हानी होईल.
२०२० च्या अखेरपर्यंत भारतात भयानक भूकंप होणार; वैज्ञानिकांकडून धोक्याचा इशारा
By कुणाल गवाणकर | Published: October 28, 2020 8:31 AM