एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 05:23 AM2024-08-02T05:23:49+5:302024-08-02T05:25:18+5:30
कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे.
शिमला:हिमाचल प्रदेशात ढगफुटीच्या अनेक घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसामुळे अनेक घरे, पूल आणि रस्ते वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.
राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, कुल्लूमधील निर्मंद, सेंज, मलाना, मंडीतील पदर आणि शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे ढगफुटी झाली. समेज खुड (नाला) मध्ये ढगफुटीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आणि इतर २८ जण बेपत्ता आहेत. घटनास्थळावरून दोन जणांची सुटका करण्यात आली आहे.
कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे.
राज्यात बुधवारपासून मुसळधार
हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात सर्वाधिक २१२ मिमी पावसाची नोंद पालमपूरमध्ये झाली. यानंतर चौरीमध्ये २०३, धर्मशालामध्ये १८३.२ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
अमित शाह यांनी घेतला आढावा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्याशी बोलून राज्यातील ढगफुटीमुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील ढगफुटीमुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल दु:ख व्यक्त केले.
देशात कुठे काय झाले?
-दिल्लीत मुसळधार पाऊस, विविध दुर्घटनांत तीन ठार
-पंजाब-हरयाणात जोरदार पाऊस, प. बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा.
-बिहारच्या जेहानाबाद आणि रोहतास जिल्ह्यात वीज पडून ५ जणांचा मृत्यू.
-पावसाळ्यात मध्य प्रदेशातील ३ जिल्ह्यांमध्ये अतिसारामुळे १७ जणांचा मृत्यू.
-गुरुग्रामममध्ये मुसळधार पावसामुळे मेट्रो रेल्वेस्थानकाजवळ तिघांना विजेचा धक्का बसला.
-पाकिस्तानच्या लाहोरमध्ये धुँवाधार पाऊस, एक ठार , ४४ वर्षांतील सर्वाधिक पाऊस येथे झाला आहे.
-जयपूरमधील घराच्या तळघरात पावसाचे पाणी घुसून पती-पत्नी, भाची बुडाली.
-उत्तराखंडमध्ये ७ जणांचा मृत्यू.