वायनाड दरडीचा विध्वंस इतका की डॉक्टरांनाही धक्का; दुसरीकडे पळून जायची होतेय इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 05:30 AM2024-08-02T05:30:29+5:302024-08-02T05:31:18+5:30
मला माझ्या वडिलांच्या निधनाच्या दिवशी जसे वाटले तसेच दु:ख आज होत आहे. ही शोकांतिका खूप मोठी आहे आणि वायनाडला उभे करण्याचे काम खूप मोठे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
वायनाड (केरळ) :वायनाड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्यामुळे इतका विध्वंस केला आहे की मृतदेहांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. शवविच्छेदन करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात तैनात असलेल्या एका डॉक्टरने याची हृदयद्रावक माहिती देताना सांगितले की, ही घटना मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही.
त्या म्हणाल्या की, मला पोस्टमॉर्टम करायची सवय आहे, पण मी जे पाहिले त्याची कल्पनाही करता येत नाही. मृतदेह इतके वाईटरित्या चिरडले गेले आहेत की ते पुन्हा पाहण्याची माझी हिंमत झाली नाही. या घटनेने मला हादरवून सोडले आहे. चिरडलेले मृतदेह पाहून मला तेथून एखाद्या हॉस्पिटलमध्ये पळून जायची इच्छा झाली होती.
वडिलांच्या निधनावेळी जे दु:ख झाले तसेच...
मला माझ्या वडिलांच्या निधनाच्या दिवशी जसे वाटले तसेच दु:ख आज होत आहे. येथील अनेकांनी तर आपले संपूर्ण कुटुंब गमावले आहे, त्यांच्या वेदना तीव्र आहेत. ही शोकांतिका खूप मोठी आहे आणि वायनाडला उभे करण्याचे काम खूप मोठे आहे. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते.