देशात उन्हाचा तडाखा कमी करण्यासाठी ज्या राज्यातून मान्सून दाखल होतो, त्या केरळमध्ये तापमानाने एन्ट्री केली आहे. मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे, परंतू सरासरीपेक्षा चार ते सहा अंशांनी तापमान वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. परंतू, केरळमध्ये काही भागात नोंदविल्या गेलेल्या तापमानाने देशभराची धडकी भरविली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच केरळमध्ये भीषण गर्मीने हजेरी लावली आहे. केरळमधील काही भागातील तापमान हे 54 डिग्री सेल्सियसपर्यंत गेले आहे. गुरुवारी केरळच्या प्राधिकरणाने दिलेल्या आकडेवारीत थिरुवनंतपुरम आणि कोझिकोडेच्या काही भागांत एवढे तापमान नोंदविले गेले आहे. अन्य चार जिल्ह्यांत ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे तापमान नोंदविले गेले आहे. तर इतर जिल्ह्यांत ४० डिग्री सेल्सियस एवढे तापमान नोंदविले गेले आहे.
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) ने गुरुवारी अहवाल तयार केला आहे. एवढे प्रचंड तापमान धोकादायक असल्याचे म्हटले आहे. येत्या काळात यामुळे गंभीर आजार आणि उष्माघाताचा धोका कित्येक पटींनी वाढू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
थिरुवनंतपुरम जिल्ह्याचा दक्षिण भाग आणि अलप्पुझा, कोट्टायम, कन्नूर जिल्ह्यांतील काही भागात 54 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, कोझिकोड आणि कन्नूर येथे गुरुवारी कमाल तापमान ४५ ते ५४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी या अहवालावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.