कर्नाटकात काँग्रेस जिंकली! पण भाजपला नवा मित्र सापडणार; देवेगौडांनी मोदींसमोर ठेवली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 02:00 PM2023-06-07T14:00:07+5:302023-06-07T14:01:12+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि विरोधी पक्ष रणनीती आखत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि विरोधी पक्ष रणनीती आखत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या हॅटट्रिक रोखण्यासाठी कॉंग्रेससह विरोधी पक्षातील नेते बैठका घेत आहेत. एकीकडे विरोधक एकजुटीची भाषा करत आहेत, तर सत्ताधारी भाजप देखील आपला मित्रपक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. टीडीपी पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्याशी मैत्री करार केल्यानंतर एचडी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएससोबत भाजप २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत युती करू शकतो.
बीजेपी आणि जेडीएस यांची युती?
माहितीनुसार, २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी कर्नाटकात भाजप आणि जेडीएस यांच्यात युतीची चर्चा आहे. जेडीएसने लोकसभेच्या चार जागांवर लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भाजप कर्नाटकात लवकरच जेडीएससोबत युती करेल, असे बोलले जात आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीने राज्यातील कॉंग्रेसची ताकद दाखवून दिली. कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर भाजप आणि जेडीएस यांच्यातील जवळीक वाढली आहे. आता दोघांनी एकत्रित निवडणुक लढण्याची तयारी दर्शवली आहे. जेडीएसचे संस्थापक एचडी देवेगौडा यांनी मंगळवारी याबाबात संकेत दिले आहेत. त्यानंतर भाजपसोबत युतीची चर्चा तीव्र झाली. कुमारस्वामी यांनी मात्र भाजपसोबत युतीचे वृत्त फेटाळून लावले आणि म्हटले, "आमचा २० वर्षांपासूनचा लढा राष्ट्रीय पक्षांविरुद्ध आहे. २०२४ ची निवडणुक दोन्हीही राष्ट्रीय पक्षांविरूद्ध होईल."
कर्नाटकच्या निवडणुकीने बदलले समीकरण
खरं तर कर्नाटकात एकूण २८ लोकसभेच्या जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत २८ मधील २५ खासदार भाजपचे निवडून आले होते आणि एका जागेवर भाजपच्या समर्थनामुळे अपक्ष उमेदवार जिंकला होता. तर कॉंग्रेस-जेडीएसचा प्रत्येकी १-१ उमेदवार जिंकला होता. मात्र, अलीकडेच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीने राजकीय समीकरण बदलले आहे. विधानसभेच्या निकालानंतरचे चित्र पाहिले तर, २८ मधील २१ जागांवर कॉंग्रेसची ताकद वाढली आहे, तर भाजपने केवळ ४ जागांवर वर्चस्व राखले आहे. याशिवाय काँग्रेस आणि भाजप दोन जागांवर समसमान तर जेडीएस एका जागेवर पुढे आहे. याच कारणामुळे भाजप जेडीएससोबत युती करण्यास इच्छुक आहे आणि कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी रणनीती आखत आहे.
देवेगौडांनी देखील दिले मैत्रीचे संकेत
एचडी देवेगौडा यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील जेडीएसच्या कामगिरीच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजपसोबतच्या मैत्रीचे संकेत दिले. २०२४ मध्ये भाजपसोबत युतीत लढणार का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटले, "मी राष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषण करू शकतो, पण याचा फायदा काय आहे? देशात असा कोणाताच पक्ष नाही, ज्याचा भाजपशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध नाही. काँग्रेस कदाचित असे म्हणू शकते की, त्यांनी कधीही भाजपशी जवळीक साधली नाही. पण डीएमके एनडीएचा भाग राहिली नाही का? डीएमकेचे संरक्षक एम करुणानिधी यांनी सहा वर्षे भाजपला पाठिंबा दिला आणि आता ते काँग्रेससोबतच्या युतीचा भाग आहेत. कोण सांप्रदायिक आणि कोण सांप्रदायिक नाही. मला माहित नाही, मला या वादात पडायचे नाही. जेडीएसचे लक्ष बंगळुरू महानगरपालिकेच्या निवडणुकांवर आहे, ज्या लवकरच होणार आहेत."