२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशातच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिकपणे सामील झाले. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील उपस्थित होते.
दरम्यान, जेडीएस पक्ष सत्ताधारी एनडीएमध्ये विलीन झाल्यानंतर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, मला आनंद वाटतो की, जेडी(एस) ने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीएमध्ये आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांच्या प्रवेशामुळे एनडीए आणि पंतप्रधान मोदींच्या न्यू इंडिया, सशक्त भारताच्या व्हिजनला आणखी बळ मिळणार आहे.
"आज आम्ही भाजपाशी हातमिळवणी करण्याबाबत औपचारिक चर्चा केली. आम्ही प्राथमिक मुद्द्यांवर औपचारिक चर्चा केली आहे. तसेच आमच्या काही मागण्या नाहीत", असे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदनगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नवीन मित्र पक्षातील नेत्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, एनडीएला मजबूत करण्यासाठी जेडीएस पक्ष आज औपचारिकपणे एनडीए आघाडीत सामील झाला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. संसदीय मंडळ आणि जेडीएस जागावाटपाचा निर्णय घेईल.