नवी दिल्ली : भारताचे पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 182 मीटर उंचीच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी भेट दिली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद झाल्याचे ट्विट केले आहे.
जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी लाखो लोकांनी हजेरी लावली आहे. यामध्ये आता देशाच्या माजी पंतप्रधानांचेही नाव जोडले गेले आहे.
देवेगौडा यांनी ट्विट करत पुतळ्यासोबत काढलेला फोटो पोस्ट केला. यावर मोदी यांनी तुम्हाला पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2013 मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. पुढील चार वर्षांत लॉर्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीला काम करण्यास देण्यात आले. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती.