बंगळुरू : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू व हासनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित सेक्स स्कँडलच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला. रेवन्ना विदेशात पळून गेल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. आपली बदनामी करण्यासाठी व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहे, असा दावा करत रेवन्ना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नुकतेच २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या हासन लोकसभा मतदारसंघातून ते एनडीए आघाडीचे उमेदवार आहेत. व्हायरल झालेल्या काही व्हिडीओ क्लिप्समध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हटले जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रानंतर मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक बिजय कुमार सिंह यांच्यासह एसआयटीत सहायक पोलिस महानिरीक्षक सुमन डी. पेनेकर, म्हैसूरच्या एसपी सीमा लाटकर यांचा समावेश आहे.
पित्रा-पुत्रावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा एच.डी. रेवन्ना व नातू प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात घरच्या स्वयंपाकी महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. त्यांनी माझ्यावर अत्याचार केला, तसेच माझ्या मुलींशी व्हिडीओ कॉल करून घाणेरड्या भाषेत बोलत होता, असे तक्रारीत म्हटले आहे.
चौकशीनंतर तथ्य बाहेर येऊ द्या
आपला पुतण्या आणि हासनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित सेक्स स्कँडलच्या चौकशीतून तथ्य बाहेर येण्याची वाट पाहूया. कोणी गुन्हा केला असल्यास त्याला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रज्वल रेवन्ना यांनी देश सोडून जाण्याशी त्याचा काहीही संबंध नाही.
- एच.डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री, कर्नाटक