नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमुख एच.डी. देवेगौडा यांनी कर्नाटक सरकार धोक्यात असल्याचे म्हटले. राज्य सरकारमधील भागीदार असलेल्या काँग्रेसच्या वागण्यावरून कर्नाटकमधील सरकार किती दिवस टिकेल हे सांगू शकत नाही, असंही देवेगौडा म्हणाले. यावेळी देवेगौडा यांनी धक्कादायक खुलासा केला असून काँग्रेसनेच मल्लिकार्जुन खरगे यांच्याऐवजी कुमारस्वामीला यांनाच मुख्यमंत्री करा असं म्हटल्याचे त्यांनी सांगितले.
देवेगौडा म्हणाले की, जेडीएस-काँग्रेसची युती व्हावी अशी इच्छा मी कधीही व्यक्त केली नव्हती. मी आजही हेच म्हणतोय आणि उद्याही म्हणेल. खुद्द काँग्रेसने आमच्याकडे येऊन तुमचा मुलगा मुख्यमंत्री होणार, काहीही होवो, असं सांगितले. परंतु, त्यावेळी मला हे ठावूक नव्हते की, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ताळमेळ नाही.
राज्यातील सरकारला आमच्याकडून काहीही धोका नाही. परंतु, सरकार किती दिवस टीकेल हे मी सांगू शकत नाही. सरकार टिकवने कुमारस्वामीच्या हातात नसून काँग्रेसच्या हातात आहे. आम्ही कॅबिनेटमधील एक जागा त्यांना दिली आहे. त्यांनी जे सांगितलं, ते आम्ही केलं. मात्र मध्यवधी निवडणूक होणार यात शंका नाही. काँग्रेसकडून ५ वर्षे पाठिंबा देण्याचे वचन देण्यात आले तरी जनता सर्वकाही पाहात असल्याची टीका देखील देवेगौडा यांनी केली.
दरम्यान देवेगौडा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरमया, मुल्लिकार्जुन खरगे, मुनियप्पा आणि परमेश्वर आपल्याकडे आले होते. मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की, खरगेंना मुख्यमंत्री करा. त्यावर खरगे म्हणाले होते की, काँग्रेस हायकमानने सांगितल्यास आपण तयार आहोत. त्यानंतर मी किर्ती आजाद यांचा फोन घेत राहुल यांच्याशी चर्चा करून खरगेंना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले. त्यावर राहुल यांनी कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, असं सांगितले. त्यानंतर आपण कुमारस्वामींना मुख्यमंत्री केल्याचे देवेगौडा म्हणाले.