लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक गाव, तालुका, जिल्ह्याचा विकास करा, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या प्रादेशिक पंचायती राज परिषदेला त्यांनी ऑनलाइन संबोधित केले.
दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथे ही परिषद आयोजित केली जात आहे. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची उपस्थिती होती. प्रथम मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून आपल्या अनुभवाचा दाखला देत मोदी म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध पदांवरील लोकांनी आपल्या गावांसाठी आणि जिल्ह्यांसाठी प्राधान्याने काही काम केले पाहिजे. ते म्हणाले की, केंद्रात सत्तेत आल्यानंतर शौचालये बांधण्याचा आणि गरिबांसाठी बँक खाती उघडण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी तीन प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यासाठी बैठका घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी जिल्हा पंचायत सदस्यांना केले.
ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधी अनेक पटींनी वाढला आहे. मनरेगाचे अुनदान पूर्वी ७० हजार कोटी रुपये होते. आता ते तीन लाख कोटी रुपये झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही ३० हजारांहून अधिक जिल्हा पंचायत इमारती बांधल्या, असेही त्यांनी सांगितले.