लखनौ : काशी विश्वनाथ मंदिरात येणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच मंदिराचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने आता या मंदिराचा शिर्डीतील साईबाबा आणि तिरुपती मंदिरासारखाच विकास करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. तिरुमाला येथील तिरुपती देवस्थान आणि शिर्डीतील साईबाबा ट्रस्ट हे दोन मंदिर व्यवस्थापन भारतातील सर्वांत जास्त देणगी मिळणारी देवस्थाने आहेत. या मंदिराला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे रोख आणि सोने चांदीसारख्या मौल्यवान वस्तूंचे दान मिळते. ‘विश्वनाथ मंदिराचे पदाधिकारी तिरुपती बालाजी, साई मंदिराला भेट देतील व त्यांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करतील. आपण स्वत:ही या दोन मंदिरांना भेट देण्याचे ठरविले आहे,’ असे उत्तर प्रदेशचे धार्मिक कामकाज राज्यमंत्री विजयकुमार मिश्रा यांनी सोमवारी येथे सांगितले. सध्या मंदिराला वार्षिक चार ते पाच कोटी रुपयांचेच दान मिळते. (वृत्तसंस्था)
काशी विश्वनाथ मंदिराचा विकास करणार
By admin | Published: February 10, 2015 3:55 AM