गांधीनगर - विधानसभा निवडणूक अवध्या काही महिन्यांवर आल्याने गुजरातमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच "विकास पागल हो गया है" चा नारा देत विरोधकांनी गुजरातमधील तथाकथित विकासाची पोलखोल सुरू केल्याने सत्ताधारी भाजपाचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसने उचलून धरलेल्या "विकास पागल हो गया है" या घोषणेला आता भाजपानेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या पागल विकासाविरोधात भाजपाने आपला बुलंद विकासचा नारा दिला आहे. "मी गुजरात आहे, मीच विकास आहे" या घोषणेसह गुजरात भाजपा काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरली आहे.सोशल मीडियामुळे 'विकास पागल हो गया है" हा नारा अल्पावधीच गुजरातमधून देशभरात पोहोचला. हा हॅशटॅग वापरून सरकारला सवाल विचारण्यात येऊ लागले. ज्या पागल विकासचा उल्लेख करून गुजरातमध्ये भाजपाला लक्ष्य केले जात आहे. त्या घोषणेची सुरुवात एका सर्वसामान्य नागरिकाने केलेल्या फेसबूक पोस्टवरून सुरु झाली होती. 20 वर्षांच्या सागर सावलिया नावाच्या तरुणाने फेसबूकवर गुजरातमधील सरकारी बस आणि तिचा तुटलेला टायर टाकून लिहिले होते की, "सरकारी बसगाड्या आमच्या आहेत, पण त्यातून प्रवास करताना सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे, जिथे आहात, तिथेच राहा कारण "विकास पागल हो गया है"त्यानंतर विकास पागल हो गया है हा हॅशटॅग आणि कॅप्शन वापरून लोक आपापल्या परिसरातील बकाल अवस्था सोशल मीडियावर शेअर करू लागले. त्यानंतर विकास कसा वेडा झालाय हे सांगण्याची सोशल मीडियावर लाटच आली. सोशल मीडियावर सुरू झालेल्या या मोहिमेने भाजपाच्या विरोधकांना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाच्या घोषणांवर टीका करण्याची आयती संधीच दिली. गुजरातमध्ये काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांनीही या घोषणेचा पुरेपूर वापर करत मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. विकासला काय झालं, असे राहुल गांधी यांनी विचारल्यावर उपस्थितांनी "गाडो थई छो" म्हणजेच तो वेडा झाला आहे, असे प्रत्युत्तर दिले. भाजपावर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेनेही आपल्या मुखपत्रातून विकासाच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकास्र सोडले. दरम्यान, विकास पागल हो गया है ही घोषणा भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने विकासालाच केंद्र बनवले असून, गुजरातमधील विकास बुलंद झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी मी आहे गुजरात, मी आहे विकास असा नारा देत विरोधकांच्या वेड्या विकासला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
विरोधकांच्या पागल विकास विरोधात भाजपाचा बुलंद विकास, अशी सुरू झाली होती पागल विकासची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 6:27 PM