ऑनलाइन लोकमत,
हैद्राबाद, दि. २२ - मागील सरकारने अतिशय वेगाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणचे विभाजन केले. त्यामुळे विनाकारण दोन्ही राज्यांमध्ये तणाव दिसून येतो. मात्र या दोन्ही राज्यांचे ह्दय तेलगू आहे हे कोणी विसरू नये. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आंध्र प्रदेशची नवी राजधानी असलेल्या अमरावती शहराच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी. राव उपस्थित होते.
शहरांचा विकास हे आव्हान न समजता संधी समजणे गरजेचे आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांमध्ये पुढे जाण्याची शक्ती असून ही राज्ये देशातील आदर्श राज्ये ठरतील असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
अमरावती शहराचा थोडक्यात आढावा -
अमरावती हे शहर सुमारे 1800 वर्षांपूर्वी सातवाहन राजांची राजधानी होती. आता पुन्हा या शहराला राजधानीची नवीन ओळख मिळणार आहे. गुंटूर जिह्यातील अमरेश्वर मंदिराच्या नावावरून ‘अमरावती’ असे नवीन राजधानीचे नाव ठेवण्यात आले आहे. या शहराचे ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व लक्षात घेऊनच अमरावतीला राजधानीचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे या राजधानीच्या भूमीपूजन समारंभ सोहळा विजया दशमीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आला.