"निवडणूककेंद्रित दृष्टिकोनाने शहरांचा विकास शक्य नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 08:54 AM2022-09-21T08:54:50+5:302022-09-21T08:57:32+5:30
महापौरांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
गांधीनगर : निवडणूककेंद्रित दृष्टिकोन बाळगून शहरांचा विकास साधता येऊ शकत नाही. त्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींनी केवळ निवडणुका जिंकण्यापुरता विचार करू नये, असा सल्ला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपशासित महापालिकांच्या महापौरांना शहरांच्या सर्वांगीण विकासाची योजना तयार करण्याचे आवाहन केले.
मोठ्या शहरांवरील भार कमी करण्यासाठी शहर विकास योजना, सॅटेलाईट शहरांची निर्मिती तसेच टायर-२ व टायर-३ शहरांच्या विकासावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी महापौरांना केले. गुजरातच्या गांधीनगर शहरात भाजपशासित शहरांच्या महापौरांची अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दोनदिवसीय परिषदेचे ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर मोदी बोलत होते. या परिषदेत १८ राज्यांतील भाजपशासित महापालिकांचे ११८ महापौर व उपमहापौर सहभागी झाले आहेत. सरकारी योजनांच्या गरीब लाभार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवा तसेच आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणावर काम करा, असे आवाहनही पंतप्रधानांनी महापौर आणि अन्य स्थानिक लोकप्रतिनिधींना केले. अनेकवेळा शहरांसाठी फायदेशीर ठरू शकणारे निर्णय केवळ अशा निर्णयांमुळे निवडणुकीत नुकसान होईल, या भीतीपोटी घेतले जात नाहीत. तुम्ही निवडणूककेंद्रित दृष्टिकोन ठेवून तुमच्या शहराचा विकास करू शकत नाही. त्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींनी केवळ निवडणुका जिंकण्यापुरता विचार करू नये, असे पंतप्रधान म्हणाले. केवळ केंद्रावर न अवलंबून राहता राज्यांनी शहर विकास योजनांसाठी पुढाकार घेतला पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या आठवणींना उजाळा देताना मोदी म्हणाले की, बस रॅपिड ट्रान्झीट प्रणाली, ॲप आधारित ॲटोरिक्षा सेवा आणि बहुआयामी वाहतूक प्रणाली यासारख्या अत्याधुनिक शहरी वाहतूक प्रणाली आणि सुविधा राबविण्यात तेव्हा गुजरात अन्य राज्यांहून पुढे होते.
गृहनिर्माण प्रकल्पांसाठीची तरतूद २ लाख कोटींवर
२०१४ मध्ये भारतातील विविध शहरांतील मेट्रो रेल्वेचे जाळे २५० किलोमीटरहून कमी होते. आता ते वाढून ७५० कि.मी. झाले असून, आणखी १ हजार कि.मी.साठीचे काम सुरू आहे. आज देशभरात १०० स्मार्ट शहरे विकसित करण्यात येत असून, आम्ही आतापर्यंत ७५ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. शहरांसाठी नागरी गृहनिर्माण हे एक मोठे आव्हान आहे. पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत आम्ही आतापर्यंत गरिबांना १.२५ कोटी घरांचे वाटप केले आहे, असेही ते म्हणाले. २०१४ मध्ये गृहनिर्माण प्रकल्पांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद होती. आज ती वाढवून २ लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. यातून शहरातील गरिबांप्रतीची आमची बांधिलकी प्रदर्शित होते, असे ते म्हणाले.
गरिबांसोबत बसून त्यांचे म्हणणे कधी ऐकले का ?
शहरातील गरिबांसोबत बसून तुम्ही त्यांच्या समस्या कधी ऐकल्या काय? योजनेची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने ती लोकांपर्यंत पोहोचली, असे मानून आपण चालतो. तुम्ही जेवढे गरीब लोकांना भेटाल, त्यांच्यासाठी काम कराल, त्याचा परतावा ते तुम्हाला बोनससह देतील. प्रकल्प वेळेत पूर्ण करा आणि दर्जाबाबत तडजोड करू नका, असे आवाहन मी तुम्हाला करतो, असेही मोदी म्हणाले.