रायपूर: कोणत्याही प्रकारच्या हिंसेला विकास हेच उत्तर असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडमध्ये केलं. यावेळी त्यांनी राज्यातील नक्षलवादाविषयी चिंता व्यक्त केली. नक्षलवाद हा विकासानंच दूर होऊ शकतो, असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला. मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून त्यांच्याकडून विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येत आहे. 'कोणत्याही प्रकारच्या हिंसेला विकास हेच उत्तर असू शकतं, असा विश्वास मला वाटतो. विकासामुळे निर्माण झालेल्या विश्वासामुळे सर्व प्रकारची हिंसा दूर सारली जाऊ शकते,' असं मोदींनी छत्तीसगडमध्ये आयोजित केलेल्या रॅलीला संबोधित करताना म्हटलं. छत्तीसगडमध्ये वर्षाच्या अखेरीस निवडणूक होत आहे. छत्तीसगडमधील नक्षली कारवायांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना विकासाचं नक्षलवाद्याला उत्तर असू शकतं, असं मोदी म्हणाले. भाजपा सरकारमुळे लोकांचा छत्तीसगडकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला, असंही मोदी म्हणाले. 'छत्तीसगड आधी जंगल आणि आदिवासी लोकांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता ते नवीन रायपूरमधील स्मार्ट सिटीसाठी ओळखलं जातं,' असं पंतप्रधानांनी म्हटलं. दुर्गम भागातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारावा आणि आदिवासींच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं यावेळी मोदी म्हणाले.
कोणत्याही हिंसेला विकास हेच उत्तर- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 5:03 PM