नवी दिल्ली - महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी २२ नोव्हेंबरच्या रातोरात केलेल्या खेळीमुळे राष्ट्रपती राजवट हटून भाजपा सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. मात्र अवघ्या ४ दिवसांत भाजपा सरकार कोसळले. मात्र या सर्व घडामोडीवर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी मोठं विधान केलं आहे.
भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला केंद्राने दिलेले ४० हजार कोटी रुपये वाचविण्यासाठी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचं नाट्य केलं असं देवेंद्र फडणवीसांचे नाव घेता सांगितले. आमचा माणूस ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला आणि राजीनामा दिला. पण हे नाट्य का केले गेलं? आमच्याकडे बहुमत नाही हे माहित असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, हा एक प्रश्न सगळेच विचारतात.
मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ४० हजार कोटी केंद्राकडून आलेला निधी होता. जर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आली तर या ४० हजार कोटींचा दुरुपयोग झाला असता. केंद्र सरकारच्या या पैशाचा वापर विकासासाठी केला गेला नसता म्हणून हे नाट्य केलं गेलं अशी माहिती हेगडे यांनी दिली.
त्याचसोबत ही योजना पूर्वीपासूनच भाजपाने बनवून ठेवली होती. शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये फडणवीसांनी केंद्राचे पैसे ज्याठिकाणी पोहचवायचे होते त्याठिकाणी पाठविले. ही योजना अंमलात आणण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा सर्व पैसा वाचविला असल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.
भाजपासोबत एकत्र लढूनही शिवसेना निवडणुकीनंतर भाजपासून वेगळी झाली. तर भाजपा-शिवसेनेविरुद्ध निवडणुका लढविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले. पण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काका शरद पवारांना दे धक्का करत भाजपाला पाठिंबा दिला. त्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं. अगदी, सकाळी-सकाळी शपथविधीही घेण्यात आला. त्यामुळे मी पुन्हा येईन, असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. मात्र, अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर बहुमत सिद्ध करणे शक्य नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.