मुंबई - राज्यातील किंबहुना देशातील सर्वात मोठ्या राजकीय बंडामुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या सत्तांतरानंतरही या सत्तास्थापनेच्या चर्चा आणि सत्तास्थापनेच्या अलीकले-पलीकडे नेमकं काय घडंलं हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यातच, शिंदेगट आणि शिवसेना एकत्र येतील का, हाही प्रश्न नव्याने समोर आला आहे. तर, आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडवीसांना फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे
एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेवर अस्थिरतेचे संकट आले. सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीभाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना एकदा नाहीतर दोनदा फोन केल्याचे वृत्तही तेव्हा माध्यमांत झळकले होते. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळले. आता, या फोनकॉलचं नेमकं काय झालं याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंचा हा फोन सरकार वाचविण्यासाठी नसून शिवसेना वाचविण्यासाठी होता, असेच या दोन्ही नेत्यांमधील संभाषणातून दिसून येईल.
उद्ध ठाकरेंनी शिवसेनेच्या तत्कालीन एका मंत्र्याद्वारे देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता. फोनवरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट एकनाथ शिंदेंना बाजुला करा आणि आमच्याशी चर्चा करा, असे आवाहन केले. एकनाथ शिदेंची बारगेनिंग पॉवर का वाढवत आहात, थेट आमच्याशी बोला. आपण भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन करू, असा प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोनकॉलद्वारे दिला होता. मात्र, आता वेळ निघून गेलेली आहे, आपण एकनाथ शिंदेंच्या विश्वासाला फसवू शकत नाही. त्यामुळे, तुम्ही थेट अमित शहांसोबत बोला, असे उत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले होते. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्याशी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमित शहांकडून फोन घेण्यात आला नाही. कारण, 2019 च्या सत्तास्थापनेवेळी अमित शहांनी मातोश्रीवर फोन केला होता. पण, उद्धव ठाकरेंनी तो कॉल घेतला नव्हता, असे वृत्त मुंबई तकने दिले आहे. दरम्यान, या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फोन केला होता. मात्र, मोदी हे कुठल्यातरी कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी अमित शहांसोबत चर्चा करण्याचे उद्धव ठाकरेंना सूचवले होते. मात्र, शहा यांच्याकडून उद्धव ठाकरेंना बोलण्यास टाळटाळ करण्यात आली. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनीही भाजपसोबत चर्चा करण्याची आशाच सोडून दिली होती.
बंडाच्या दुसऱ्याच दिवशी फडणवीसांना फोन
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. एवढच नाहीतर मिलिंद नार्वेकर यांनाही सुरतमध्ये पाठवले होते. पण, एकनाथ शिंदेंनी काही ऐकलं नाही. शिंदेंनी फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीमुळे या बंडामागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची बातमी झळकली होती.