मुंबई: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होण्याआधी विमानतळावर एक प्रसंग घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राहुल गांधी भुवनेश्वर विमानतळावर असताना एक फोटोग्राफर तीन-साडेतीन फुटांवरुन पडला. त्यावेळी राहुल गांधी क्षणाचाही विलंब न करता त्याची विचारपूस करण्यासाठी धावून गेले. यानंतर ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमांसाठी रवाना झाले.राहुल गांधी फोटोग्राफरची विचारपूस करण्यासाठी धावून गेले, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ काँग्रेसकडून सोशल मीडियावर वेगानं शेअर केला जाऊ लागला. मोदी भाषण करताना त्यांच्या शेजारी असलेला एक पोलीस अधिकारी चक्कर येऊन खाली पडतो. मात्र तरीही मोदी त्यांचं भाषण थांबवत नाहीत. शेजारी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस या अधिकाऱ्याच्या मदतीसाठी धावतात. या दरम्यान मोदी मागे वळून पाहतात. मात्र तरीही भाषण सुरूच ठेवतात, असं दृश्य या व्हिडीओत दिसत आहे. लोकमतनं या व्हिडीओची खातरजमा केली असता, तो 15 ऑगस्ट 2013चा असल्याचं दिसून आलं. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण करताना पोलीस महासंचालक अमिताभ पाठक चक्कर येऊन पडले. त्यावेळी मोदी त्यांच्यापासून अगदी काही फूट अंतरावर होते. मोदींचं भाषण सुरू होऊन अर्धा तास झाला, त्यावेळी पाठक कोसळले. त्यावेळी मोदींनी बाजूला पाहिलं. यानंतर व्यासपीठावरील इतर पोलीस अधिकारी पाठक यांच्या मदतीला धावले. त्यांनी पाठक यांना व्यासपीठावर खाली नेलं. यावेळीही मोदींनी मागे वळून पाहिलं. मात्र त्यांनी भाषण सुरुच ठेवलं.