मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला नाही असा आरोप करण्यात आला. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये जाऊन रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल झाली. त्यानंतर याचा तपास करणाऱ्या बिहारच्या अधिकाऱ्याला मुंबईत आल्यानंतर क्वारंटाईन करण्यात आलं. त्यानंतर या संपूर्ण घडामोडीत बिहारचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस(DGP) गुप्तेश्वर पांडे यांची एन्ट्री झाली.
मुंबई पोलिसांवर वारंवार टीका केल्यानं गुप्तेश्वर पांडे हिंदी माध्यमांसाठी हिरो ठरले. त्यानंतर आता गुप्तेश्वर पांडे नवीन अवतारात लोकांसमोर येत आहे. बिग बॉस सीजन १२ मधील गायक दीपक ठाकूर यांच्या रॉबिनहुड बिहार के हे गाणं गुप्तेश्वर पांडे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. “डीजीपी गुप्तेश्वर पांडे, रॉबिनहुड बिहार के” हे गाणं दीपकनं गायलं असून त्यानेच निर्मितही केलं आहे. या गाण्याचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. येत्या २० सप्टेंबर रोजी हे संपूर्ण गाणं लोकांना पाहायला मिळेल.
या गाण्यात गुप्तेश्वर पांडे हे दीपकसोबत एक्टिंगही करताना दिसत आहेत. दीपकने या गाण्याचा ट्रेलर त्याच्या युट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केला आहे. या गाण्याचा पोस्टर रिलीज केला आहे त्यात गुप्तेश्वर पांडे एका सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. तर त्यांच्यामागे दीपक उभा आहे.
कोण आहेत गुप्तेश्वर पांडे?
१९८७ बॅचमधील गुप्तेश्वर पांडे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते सोशल मीडियात चर्चेत आहेत. फेसबुकवर त्यांचे ७ लाख फोलोअर्स आहेत. तर ट्विटर एप्रिलपासून त्यांच्या फोलोअर्सची संख्या अडीच लाखांपर्यंत पोहचली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि हाय प्रोफाईल प्रकरणाशी संबंधित ते सोशल मीडियात टीप्प्णी करत असतात. सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर गुप्तेश्वर पांडे देशभरात चर्चेत आले. २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी गुप्तेश्वर पांडे यांना डीजीपी बनवण्यात आले. त्यापूर्वी ते मुंगेर आणि मुजफ्फरपूर झोनचे डीआयजी होते. अनेक नक्षलग्रस्त भागात त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.
गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणुकही लढवली होती.
गुप्तेश्वर पांडे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून येतात. राजकारणातही त्यांनी स्वत:ची नशीब आजमवून पाहिले होते मात्र त्यात अयशस्वी झाले. २००९ मध्ये बक्सर लोकसभा जागेवरुन भाजपाकडून उभं राहण्याची इच्छा होती. त्यासाठी पांडे यांनी पदाचा राजीनामा दिला. मात्र भाजपाने त्यांना तिकीट दिली नाही. खासदार लालमुनी चौबे यांनाच भाजपाने पुन्हा तिकीट दिले. या निवडणुकीत भाजपा उमेदवाराचा पराभव झाला होता.
गुप्तेश्वर पांडे यांच्या बिहार डीजीपी पदाचा कार्यभार फेब्रुवारी २०२१ पर्यंत संपणार आहे. यापूर्वी असं सांगितलं जात आहे की, गुप्तेश्वर पांडे पुन्हा एकदा राजकारणाकडे वळू शकतात. मात्र अद्याप हे स्पष्ट नाही. पण सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन गुप्तेश्वर पांडे यांनी शिवसेना आणि मुंबई पोलीस यांच्याविरोधात ज्याप्रकारे आक्रमक वक्तव्य केली होती. त्यामुळे अनेक माध्यमात ते थेट बिहार सरकारची बाजू मांडताना दिसत होते.
रिया चक्रवर्तीची 'औकात' काढल्यानंतर डीजीपी गुप्तेश्वर पांडे नेटीझन्सकडून ट्रोल
बिहारच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलण्याची रिया चक्रवर्तीची 'औकात' नाही असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं होतं. मात्र यामुळे सोशल मीडियातून डीजीपी पांडे यांना ट्रोल करण्यात आले होते. पोलीस महासंचालक पदाच्या व्यक्तीने एखाद्या नागरिकाबद्दल असे शब्द वापरणे चुकीचे आहे. डीजीपींच्या पदाला आणि प्रतिष्ठेला हे शोभत नाही, असे म्हणत नेटीझन्सने पांडे यांच्यावर टीका केली होती.
हा बघा ट्रेलर