नवी दिल्ली, दि. 28 - नजफगड येथील सकरवती गावात ढाबा मालक आणि त्याच्या मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे फक्त कूलरची जागा बदलण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरुन बाप आणि मुलाची हत्या करण्यात आली. गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला, मात्र त्यांच्यातील एकाला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. ढाब्याच्या मालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. मुलाला रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं, मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटना रात्री 10 वाजता घडली आहे. श्याम वर्मा आपला मुलगा मयांकसोबत 'संगीता हॉटेल' नावाचा ढाबा चालवत होते. रात्री 9.30 वाजताच्या दरम्यान पाचजण ढाब्यावर आले. त्यांच्याकडे दोन दुचाकी होत्या. त्यांनी मयांकला जेवण आणण्यासाठी सांगितलं. जेव्हा त्यांना थोडी वाट पहावी लागेल असं सांगण्यात आलं तेव्हा त्यांचा पारा चढला आणि अश्लील भाषेत शिव्या देण्यास सुरुवात केली. श्याम वर्मा यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या मुलाला जेवणाची ऑर्डर घेण्यास सांगितलं.
यानंतर आरोपींनी कुलर आपल्याजवळ ठेवण्यास सांगितलं. मयांकने कुलर आहे त्या जागेवरुन हटवण्यास नकार दिला. ढाब्यावर इतरही ग्राहक असल्याने कूलर हलवणार नाही असं मयांकने सांगितल्यावर त्यांचा रागाचा पारा अजून चढला आणि त्यांच्यातील एकाने उठून कूलरला लात घातली. कूलर खाली पडल्याने खराब झाला आणि वादावादीला सुरुवात झाली.
भांडण सुरु असताना त्यांच्यातील एकाने मयांकच्या गळ्यावर गोळी घातली. फायरिंगचा आवाज ऐकून तिथे उपस्थित सर्व लोकांची धावपळ सुरु झाली. श्याम वर्मा तेव्हा कॅश काऊंटरवर बसले होते. फायरिंगचा आवाज ऐकून ते धावत आले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी श्याम वर्मा यांच्यावरही गोळी झाडण्यात आली. त्यांच्या डोक्याला गोळी लागली. यानंतर सर्व आरोपींनी पळ काढला. स्थानिकांनी श्याम वर्मा आणि मयांकला रुग्णालयात भर्ती केलं. श्याम वर्मा यांना मृत घोषित करण्यात आलं, तर मयांकचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.