- प्रसाद आर्वीकरचंडीगड - ‘यह ढाई किलो का हाथ किसी पर पडता हैं तो आदमी उठता नहीं उठ जाता हैं’ अशा अन्यायाच्या विरोधात पेटून उठणाऱ्या डायलॉगमुळे लाेकप्रिय झालेले अभिनेता तथा खासदार सनी देओल यांचा बोलबाला संसदेत मात्र चालला नाही. संपूर्ण पाच वर्षांत संसदेत त्यांनी केवळ एक प्रश्न विचारला. परिणामी, सनी देओल यांना यावेळी खासदारकीचे तिकीट गमवावे लागले आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून सनी देओल यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सनी देओल यांनी काँग्रेसचे तत्कालीन खासदार सुनीलकुमार जाखड यांचा ८२ हजार मतांनी पराभव केला होता. लोकांनी सनी देओल यांना संसदेत पाठवले खरे; पण खासदार सनी पाजी यांनी असमाधानकारक कामगिरी केली. मतदारसंघातही ते फिरकले नाहीत. नागरिकांचीही त्यांच्यावर नाराजी हाेती. देशप्रेम आणि अन्यायाविरुद्ध लढणारा युवक, अशा भूमिका त्यांनी चित्रपटांतून केल्या. मात्र, त्यांची जादू संसदेत चालली नाही. सनी देओल यांनी एका मुलाखतीत अभिनेता राहण्यालाच पसंती असल्याचे सांगितले आहे.
किती हाेती लाेकसभेत उपस्थिती?- पीआरएस लाॅजेस्टिक रिसर्च या सेवाभावी संस्थेने काही दिवसांपूर्वी एक सर्वेक्षण केले.- त्यात गुरुदासपूर मतदारसंघाचे भाजपचे खासदार सनी देओल यांची संसदेतील उपस्थिती चार वर्षांत केवळ १८ टक्के एवढी राहिली.
ज्यांचा पराभव केला त्यांनीच कापले तिकीट- २०१९ मध्ये सन्नी देओल यांनी त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार आणि खासदार सुनीलकुमार जाखड यांचा पराभव केला होता.- जाखड यांनी त्यानंतर परत भाजपात प्रवेश केला. या काळात जाखड यांच्या कार्याची दखल घेत भाजपाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. -त्यात भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांनी सनी देओल यांचे तिकीट कापले आणि गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून दिनेशसिंह बब्बू यांना उमेदवारी जाहीर केली.