Bangladesh Violence Protests : बांगलादेशात आरक्षणाविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बांगलादेश सरकारने रविवारी देशभरात संचारबंदी वाढवली. बांगलादेशात झालेल्या या हिंसाचारात आतापर्यंत १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही. दुसरीकडे, या हिंसक आंदोलनादरम्यान १२० भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे देशात परतले आहेत. मात्र महाराष्ट्रातील एक खेळाडू अद्याप बांगलादेशात अडकून पडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका आजारामुळे काही तासांमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्या खेळाडूकडे लवकरात लवकर मदत पोहोचावी अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील इंद्रजित रवींद्र महिंद्रकर हा तरुण बांगलादेशच्या ढाकामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाला होता. मात्र तिथे सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे इंद्रजित ढाकामध्ये अडकून पडलेला असून त्याच्याशी संपर्क होत नाहीये. अशातच आजारामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्याने त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे इंद्रजितला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी विनंती केली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. "बीडच्या अंबाजोगाई जिल्ह्यातील इंद्रजित रवींद्र महिंद्रकर हा खेळाडू आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अकादमी ढाका आयोजित बुद्धिबळ स्पर्धेसाठी बांगलादेश येथे गेला आहे. तो सध्या ढाका शहरातील हॉटेल पॅसिफिकमध्ये अडकला आहे आणि त्याला अचानक अपेंडिसाइटिसचा गंभीर आजार झाला आहे. पुढील ७२ तासांत त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. परंतु सध्या त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे कृपया सरकारने हस्तक्षेप करावा," असे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बांगलादेश मुक्ती संग्रामातील सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण देण्याच्या घोषणेनंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनांनी सरकार हादरले आहे. मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने रविवारी सैनिकांच्या नातेवाईकांसाठीचा कोटा ३० टक्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने रविवार आणि सोमवार सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. या कालावधीत केवळ आपत्कालीन सेवांना काम करण्याची परवानगी असेल.