नवी दिल्ली - बिहारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने आलेली बस डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. बिहारच्या गया जिल्ह्यातून पश्चिम बंगालला जाणाऱ्या प्रवासी बसला झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात अपघात झाला. राजगंज पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोन दलुडीहजवळ ही दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते. ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांनी मद्यप्राशन केल्याचे एका जखमी प्रवाशाने सांगितले. तो भरधाव वेगात बस चालवत असल्याने वेगावर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यामुळेच बस महामार्गावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. बस पलटी झाल्याचा मोठा आवाज आणि प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या हॉटेल आणि गॅरेजमधील लोकांनी तेथे धाव घेतली.
अपघातात किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर प्रथमोपचाराची व्यवस्था
अपघातीची माहिती मिळताच राजगंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव मोहीम राबवून बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका बोलावून जखमींना धनबादमधील रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली असून इतरांना नंतर पोलिसांनी त्यांच्या इच्छित स्थळी पाठवले आहे. काही दिवसांपूर्वी जीटी रोडवरील पुलावरून एक भरधाव कार खाली पडली होती. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.