धनबाद-झारखंडच्या धनबादमध्ये 'अजब प्रेम की गजब कहानी' पाहायला मिळाली. गेल्या ८० तासांपासून प्रेयसी आपल्या प्रियकराच्या घराबाहेर ठाण मांडून बसली होती. अखेरीस प्रियकर लग्नासाठी तयार झाला आणि दोघांच्याही कुटुंबीयांनी पुढाकार घेत धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. धनबादच्या महेशपूर परिसरातील ही घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेशपूरचे पंचायतचे प्रमुख मनोज महतो यांनी पुढाकार घेत वर पक्षाचे कुटुंबीय आणि वधूचे कुटुंबीय गंगापूर स्थित लिलौरी माताच्या मंदिरात पोहोचले. मंदिराचे पुजारी उदय तिवारी यांनी वैदीक पद्धतीत लग्न लावून दिलं. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रेमिका निशा आणि महेशपूरचा रहिवासी असलेला उत्तम महतो यांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंधं होते. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण लग्नाच्या २० दिवस आधी उत्तम यानं लग्नास नकार दिला. त्यानंतर निशा कुटुंबीयांसह थेट उत्तमच्या घरी पोहोचली आणि दरवाजाबाहेरच उपोषणाला बसली. यानंतर उत्तम आणि त्याचे कुटुंबीय फरार झाले होते.
अखेरीस निशाच्या वडिलांनी राजगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दोन्ही पक्षांची अनेकदा बैठक झाली व लग्नास तयार झाले. लग्नानंतर निशानं आपलं प्रेम आपल्याला मिळाल्याचा आनंद असल्याचं म्टलं. तसंच पोलिसात दाखल केलेली तक्रार देखील मागे घेतली आहे.