नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. तर काहींचा कमी लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा संपन्न झाला आहे. याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ना बँड-बाजा, ना वरात काढत अवघ्या 500 रुपयांत लग्न झाल्याची घटना समोर आली आहे. धार जिल्ह्यातील दोन अधिकाऱ्यांनी साधेपणाने लग्न करून दाखवत एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. कोरोना काळात या अधिकाऱ्यांचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे.
धारमधील सिटी मॅजिस्ट्रेट शिवांगी जोशी यांचा विवाह आर्मीमध्ये मेजर पदावर कार्यरत असणाऱ्या अनिकेत चतुर्वेदी यांच्याशी फक्त 500 रुपयांत झाला आहे. हे दोघेही भोपाळमध्ये राहतात. शिवांगी आणि अनिकेत हे दोघेही लग्नावर होणाऱ्या उधळपट्टीच्या विरोधात होते. त्यामुळेच त्यांनी कोर्टामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. बँड-बाजा आणि इतर गोष्टींसाठी पैसे खर्च न करता फक्त फुलांचे हार आणि मिठाई यासाठी 500 रुपयांचा खर्च केला आहे. या नवदाम्पत्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्वत्र रंगली लग्नाची जोरदार चर्चा
शिवांगी जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वीच दोघांच्या घरच्यांच्या संमतीने हे लग्न निश्चित झालं. मात्र कोरोनामुळे हे लग्न पुढं ढकललं जात होतं. अखेर या शिवांगी आणि अनिकेत यांनी एकत्र बसून यावर तोडगा काढला आणि नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय़ घेतला. कोरोना काळात मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा हा निर्णय दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांना सांगितला आणि त्यांची सहमती मिळवली. या दोघांनीही अत्यंत साध्या पद्धतीनं विवाह करून समाजापुढे एक अनोखा आदर्श ठेवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.