जर तुमच्या मुलालाही फुग्यांसोबत खेळण्याची आवड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एका फुग्याने १३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवस मुलाने हॉस्पिटलमध्ये जीवन-मृत्यूशी झुंज दिली आणि अखेर मुलाचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कांगडाच्या ज्वाली येथील आहे. १३ वर्षांचा विवेक कुमार सरकारी शाळेत शिकत होता. गुरुवारी विवेक शाळा आटोपून घराकडे निघाला. शाळेच्या गेटवर तो फुगा फुगवायला लागला, तो फुगवताना अचानक फुग्यातून हवा आली आणि एका झटक्यात ती विवेकच्या तोंडात गेली. विवेकच्या गळ्यात हा फुगा अडकला.
शाळेतील शिक्षकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मुलाला रुग्णालयात दाखल केलं. येथे प्राथमिक उपचारानंतर मुलाला पंजाबमधील पठाणकोट येथील अमनदीप रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या पथकाने विवेकच्या गळ्यातील फुगा काढला, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होती. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास विवेकने अखेरचा श्वास घेतला.
विवेक अत्यंत गरीब कुटुंबातील होता. मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असतानाच शाळा आणि गावातही शोककळा पसरली आहे. शाळेतील मुलं आणि कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले. विवेकचे वडील रोजंदारी मजूर म्हणून काम करतात आणि आई गृहिणी असून मोठी बहीण बारावीत शिकते.
कांगडा येथील ज्वालीच्या माजी आमदार नीरज भारती यांनीही मुलाच्या कुटुंबाला मदत केली आहे. नीरज भारती यांनी मुलाच्या उपचारासाठी ५० हजार रुपये दिले होते. याशिवाय शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाच्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली होती, मात्र मुलाचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनंतर गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.