Dharma Sensor Board : अलीकडच्या काळात सिनेमांमध्ये दाखवला जाणारा कंटेंट अनेकदा एखादया धर्माची भावना दुखावणारा असतो. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे शाहरुख खानचा पठाण. भगवा हा रंग हिंदू धर्माचं प्रतिक असताना बेशरम रंग गाण्यात दीपिकाने भगव्याच रंगाची बिकीनी घालत अंगप्रदर्शन केल्याने हिंदू संघटना आक्रमक झाली. याचसंदर्भात आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
ओटीटी, सोशल मीडिया किंवा टीव्ही शो मध्ये हिंदूंचा अपमान झाल्याचं निदर्शनास आलं तर यावर धर्माचार्य आणि हिंदू धर्माचे जाणकार लक्ष ठेवतील. जगतगुरु शंकराचार्य यांनी धर्म सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली आहे. हे बोर्ड सिनेमांमधील धार्मिक बाबींवर लक्ष ठेवेल आणि त्याला मंजूरी देईल. उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट काउंसिलचे उपाध्यक्ष तरुण राठी यांनी सांगितले, कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी धर्म सेन्सॉर बोर्ड त्यातील धार्मिक बाजू बघेल आणि मगच अशा सिनेमांना मंजूरी देईल. धर्म सेन्सॉर बोर्डकडे तो अधिकार असेल.
तरुण राठी यांनी पुढे सांगितले, चित्रपट बनल्यानंतर जर त्यात धार्मिक भावना दुखावल्याचं आढळलं तर त्यांना सिनेमात बदल करावे लागणार. कोटी रुपये खर्च करुन जर नंतर बदल करावे लागणार असतील तर यात त्यांचंच नुकसान आहे.
जगतगुरु शंकराचार्य यांनी सांगितले, 'काही मोजके लोक विविध माध्यमांतून ८०० कोटी प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. मात्र यातून ते संस्कृती, परंपरा, धर्म आणि समाजातील संवेदनशील मुद्द्यांना ठेच पोहोचवतात. समाजात द्वेष पसरवतात. म्हणूनच लोकांच्या आग्रहास्तव आम्ही धर्म सेन्सॉर बोर्ड स्थापन केले आहे जे चित्रपट, मालिका, वेब सिरीज यातील दृश्यं, संवाद, कथा यावर लक्ष ठेवेल. जेणेकरुन समाजात द्वेष परवणाऱ्या गोष्टी त्या करोडो लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत.
तरुण राठी हे २००५ मध्ये सेंसर बोर्डात होते. सध्या ते उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट काऊन्सिलचे उपाध्यक्ष आहेत.