नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात होत असलेली वाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी डोके वाढवणारी ठरत आहे. एकीकडे कोरोना संकटामुळे उद्योग, व्यवसाय बंद होऊन बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र सातत्याने होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे देशवासी हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहेत. देशातील काही ठिकाणी पेट्रोलनंतर आता डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. यावरून काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या टीकेला उत्तर देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. (dharmendra pradhan asks rahul gandhi must answer why fuel prices are high in congress ruled states)
मुंबईत पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडल्यानंतर आता राजस्थानमधील श्रीगंगानगर भागात डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तरीही पेट्रोलियम कंपन्यांकडून एक दिवसाआड इंधनदरवाढ सुरूच आहे. यावर देशभरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, होय मला मान्य आहे की, या संकटाच्या काळात इंधनाचे दर वाढल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, केंद्र किंवा राज्य सरकारची सुमारे ३५ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम कोरोना लसीकरणासाठी वर्षभरात खर्च होणार आहे, असे प्रधान म्हणाले.
“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली
कल्याणकारी योजनांसाठी पैसे वाचवतोय
कोरोना संकटाच्या काळात एक लाख कोटी रुपये खर्च करून पंतप्रधानांनी आठ महिन्यांसाठी मोफत धान्य देण्यासाठी, पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली आहे. पीएम किसान योजनेद्वारे हजारो कोटी रुपये देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट पोहोचवले आहेत. मी याच वर्षातील खर्चाबाबत बोलत आहे, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींवर टीकास्त्र
देशात रोजागार निर्मितीसाठी विकासकामे होण्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता भासत आहे. या काळात, आम्ही पैसे वाचवून लोक कल्याणाच्या कामात लावले. जर राहुल गांधींना गरिबांबद्दल एवढीच कळवळ चिंता आहे, तर त्यांना आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदेश द्यावा. मुंबईत सर्वांत महाग पेट्रोल यामुळे आहे. महाराष्ट्राचा कर देशात सर्वांत जास्त आहे. राजस्थानचा कर पेट्रोलवर सर्वात जास्त आहे, अशी टीका धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलताना केली.
“नाना पाटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला
दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर अद्याप कमी करता येणार नाहीत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या अगोदरच स्पष्ट केले असून, सरकारचे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे इंधन दर आता कमी करता येणार नाहीत, असे ते म्हणाले होते.