महाराष्ट्र, राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक कर; धर्मेंद्र प्रधानांचे सोनिया गांधींना प्रत्युत्तर
By देवेश फडके | Published: February 23, 2021 04:09 PM2021-02-23T16:09:26+5:302021-02-23T16:12:58+5:30
पेट्रोल-डिझेलच्या दरात सलगपणे वाढ करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनदरात वाढ केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विरोध दर्शवला होता. याला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये इंधनावर सर्वाधिक कर असल्याचा टोला धर्मेंद्र प्रधान यांनी लगावला आहे.
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात सलगपणे वाढ करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनदरात वाढ केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विरोध दर्शवला होता. याला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये इंधनावर सर्वाधिक कर असल्याचा टोला धर्मेंद्र प्रधान यांनी लगावला आहे. (dharmendra pradhan says sonia ji must know rajasthan and maharashtra have maximum tax on fuel)
कोरोना संकटामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या महसुलावर मोठा परिणाम झाला. केंद्राकडून कोरोना संकटाची लढण्यासाठी आणि नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी सर्वाधिक निधी वापरला गेला. सोनिया गांधी यांना माहिती असायला हवे की, राजस्थान आणि महाराष्ट्र या दोन राज्ये इंधनावरील सर्वाधिक कर वसूल करतात, अशा शब्दांत धर्मेंद्र प्रधान यांनी प्रत्युत्तर दिले.
Due to an increase in prices of crude oil in international markets, consumer price (for petrol & diesel) has risen. This will soften gradually. Global supply was reduced due to COVID in turn affecting production as well: Union Petroleum Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/TN9N52U2rm
— ANI (@ANI) February 23, 2021
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशातील इंधनदरवाढ पेट्रोलियम कंपन्यांकडून केली जात आहे. याचा परिणाम सामान्य जनतेवर होत असल्याची जाणीव सरकारला आहे. मात्र, कालांतराने इंधन दर कमी होतील, असा विश्वास धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
लाल किल्ला हिंसाचाराप्रकरणी आणखी दोघांना अटक; कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप
पेट्रोल-डिझेलवर जीएसटी
कोरोना संकटामुळे उत्पादन आणि पुरवठा दोन्हींवर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता या दोन्ही गोष्टी गतिमान होतील. पेट्रोल आणि डिझेलवर वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी (GST) लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. जीएसटी काउंन्सिल यावर निर्णय घेईल, असा पुनरुच्चार धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी केली.
दरम्यान, दोन दिवस विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका दिला आहे. मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९९.४५ रुपये झाला आहे. सलग १२ दिवस कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. या १२ दिवसात पेट्रोल ३.२८ रुपयांनी आणि डिझेल ३.४९ रुपयांनी महागले होते.