“राम मंदिरामुळे गरिबी संपुष्टात आली का? केवळ मतांसाठी वापर”; काँग्रेस नेत्याची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 08:00 PM2024-02-20T20:00:42+5:302024-02-20T20:01:34+5:30
Congress Vs BJP: भाजपाने देशासाठी काही केलेले नाही. गरिबांना फायदा झाला, असा एकही कार्यक्रम १० वर्षांत भाजपाने घेतला नाही, अशी टीका काँग्रेस नेत्याने केली आहे.
Congress Vs BJP: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रामभक्त रामललाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांनी रामदर्शन घेतले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. भाविकांना सुलभतेने रामदर्शन घेता यावे, यासाठी मंदिर ट्रस्ट प्रयत्नशील आहे. मात्र, राम मंदिरावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि मंत्री संतोष लाड यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष लाड यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. राम मंदिराच्या उभारणीवर आक्षेप नाही. पण ज्या ठिकाणी राम मंदिर बांधले गेले आहे, ती जागा योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने सूचित केलेल्या जागेवर राम मंदिर बांधलेले नाही. आताचे राम मंदिर वेगळ्या जागी बांधले आहे. राम मंदिराचे केवळ ४० टक्के बांधकाम झाले आहे. राम मंदिर हे राजकीय इच्छाशक्तीमुळे बांधले गेले आहे. राम मंदिरामुळे गरिबी संपुष्टात आली आहे का? राम मंदिराच्या नावावर मते का मागता? अशी विचारणा कर्नाटक काँग्रेसचे मंत्री संतोष लाड यांनी भाजपाला केली आहे.
देशात दहा वर्षांपासून हुकूमशाही सुरू
देशात दहा वर्षांपासून हुकूमशाही सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत जी काही उद्घाटने झाली, ती फक्त मोदींनीच केली. देश उद्ध्वस्त झाला आहे. गरिबांना फायदा झाला, असा एकही कार्यक्रम गेल्या दहा वर्षांत झालेला नाही. दहा वर्षात त्यांची कामगिरी काय? पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले का? निवडणुका आल्या की अजेंडा ठरवतात. सत्तेचा गैरवापर होता कामा नये, या शब्दांत काँग्रेस नेते लाड यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
भाजपाने देशासाठी काहीही केलेले नाही
केवळ राम मंदिर, नितीश कुमार, पराभूत कमलनाथ यांना घेऊन भाजपा काय करणार? कोणत्याही हिंदूला याचा फायदा झालेला नाही. भाजपने काही केलेले नाही. गॅरंटीच्या मागे जाऊन मतदान झाले, तर भाजप जिंकणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर भाजपा जिंकणार नाही. म्हणूनच राम, रहीम असे मुद्दे पुढे आणले जात आहेत. पुढील १०० दिवस फक्त विकासावर चर्चा करावी, असे आव्हान लाड यांनी भाजपाला दिले आहे. तसेच भाजपा केवळ दिखाऊपणा करत आहे. भाजपाने देशासाठी काहीही केलेले नाही. देश कर्जात बुडाला आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाच्या भाषणाचे व्हिडिओ आहेत, ते भाजपवाल्यांनी ऐकावे, असा खोचक सल्लाही लाड यांनी दिला.