काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने बुधवार छापे टाकले. ओडिशा आणि झारखंडमध्ये टाकण्यात आलेल्या या छाप्यात आयकर विभागाने 300 कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचा दावा केला जात आहे. महत्वाचे म्हणजे, छापेमारी करून 4 दिवस झाले आहेत आणि अजूनही नोटा मोजायचे काम सुरूच आहे. एवढेच नाही, तर अद्याप 136 बॅगमध्ये भरलेले पैसे मोजणे अद्याप बाकीच आहे. यातच आता कांग्रेसनेही आपल्या नेत्यावरच सवाल उपस्थित केले आहे.
यासंदर्भात ट्विट करत काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, "खासदार धीरज साहू यांच्या बिझनेससोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काही घेणे-देणे नाही. केवळ तेच सांगू शकतात आणि त्यांनी हे स्पष्टही करायला हवे, की आयकर अधिकाऱ्यांकडून, त्यांच्या ठिकानांवरून एवढी मोठी रक्कम कशी जप्त केली जात आहे."
रोख मिळाल्यापासून राजकारण सुरू - खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणांवर एवढी प्रचंड रोकड सापडल्यानंतर, राजकारण सुरू झाले आहे. यानंतर, ही जप्त केलेली रोकड काँग्रेस नेत्यांची असल्याचे झारखंडमधील भाजप नेते म्हणत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते ही रक्कम भाजप नेत्यांची असल्याचे म्हणत आहेत.
यासंदर्भात बोलताना, भाजप खासदार संजय सेठ म्हणाले, आतापर्यंत 300 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पैसे मोजले जात आहेत, मशीन्स खराब होत आहेत. मात्र, पैसा संपत नाही. याचवेळी, प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, हा पैसा कुठून आला? हे मी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना विचारू इच्छितो. याची योग्य चौकशी झाली पाहिजे. हा चांगला पैसा नाही, तर हा काळा पैसा आहे.