चेन्नई, दि. 10 - जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये सुरू झालेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडणार आहे. डिसेंबर 2016पासून तामिळनाडूमधल्या अण्णा द्रमुकचे दोन गट पडले. आता हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. या सहा महिन्यांत अण्णा द्रमुकमध्ये बंडखोरीसुद्धा झाली आणि राज्यात दोनदा मुख्यमंत्रीही बदलले.सूत्रांच्या माहितीनुसार, ई. पलानीस्वामीच्या गटानं चेन्नईच्या पक्ष मुख्यालयात यासंदर्भात बातचीत केली आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वमच्या गटाचीही त्यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम लवकरच यावर निर्णय घेणार असून, दोन्ही एकत्र आल्यास पनीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे. जयललिता यांनी निधनापूर्वी पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. मात्र शशिकलांच्या विरोधामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर शशिकला यांनी पलानीस्वामींना मुख्यमंत्री बनवलं होतं. या सर्व प्रकारानंतर पनीरसेल्वम यांनी समर्थक नेत्यांना सोबत घेऊन दुसरा पक्ष स्थापन केला आहे. दोन्ही गटांना एकत्र आणण्याची जबाबदारी शशिकला यांचा पुतण्या टीटीवी दिनाकरन यांनी सांभाळली आहे. दिनाकरन पक्षातील स्वतःचं पद पुन्हा मिळवू पाहत आहेत. मात्र पनीरसेल्वम गटानं शशिकला आणि दिनाकरन यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरच पुन्हा विलीन होण्याचा विचार करू, असं म्हटलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि इतर चार मंत्र्यांना मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश गुरुवारी दिले होते.अखिल भारतीय अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची या चार मंत्र्यांनी तुरुंगात भेट घेतली, त्यामुळे मंत्र्यांना अपात्र ठरवावे, अशी याचिका न्यायालयात करण्यात आल्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिला होता. काही महिन्यांपूर्वी चार मंत्र्यांनी शशिकला यांची तुरुंगात भेट घेतल्याच्या आरोपानंतर पलानीस्वामी यांनी या मंत्र्यांना प्रश्न विचारला नाही, या आरोपावर मदुराई खंडपीठाने त्यांना स्पष्टीकरण मागितले आहे.शशिकला या भ्रष्टाचाराच्या खटल्यात तुरुंगवास भोगत असून मंत्र्यांनी त्यांची भेट सरकारच्या कामकाजाची चर्चा करण्यासाठी घेतली. अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे दिवंगत माजी आमदार तमाराईकणी यांचा मुलगा अनाळगन यांनी दाखल केलेली ही याचिका न्या. के. के. शशिधरन आणि न्या. जी. आर. स्वामीनाथन यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली असताना पलानीस्वामी आणि त्यांचे चार मंत्री के. ए. सेंगोत्तायन, दिंडिगड श्रीनिवासन, कामराज आणि एस. के. राजू आणि राज्य विधिमंडळाचे सचिव यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.याचिकाकर्त्याने मंत्र्यांनी शशिकला यांची तुरुंगात घेतलेली भेट ही मंत्र्यांनी मंत्रिपद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचे उल्लंघन असल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, असे म्हटले होते. या मंत्र्यांना न खडसावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनाही अपात्र ठरवावे, अशीही याचिकेत मागणी केली होती. गौरी शंकर यांचे हे म्हणणे कोणत्याही मंत्र्याने नाकारलेले नाही, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय 28 फेब्रुवारी रोजी चारही मंत्र्यांनी आम्ही शशिकला यांची तुरुंगात सरकारच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचे मान्य केले, असा आरोपही याचिकेत करण्यात आलेला आहे. आमचे सरकार शशिकला यांचा सल्ला आणि मार्गदर्शनानुसार चालते या मंत्र्यांच्या कबुलीमुळे मुख्यमंत्री आणि चार मंत्र्यांनी घटनेचे उल्लंघन केल्याचे अनाळगन यांनी म्हटले.
अण्णा द्रमुकचे दोन्ही गट येणार एकत्र, राजकीय नाट्याला मिळणार पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 3:14 PM