झारखंडचे काँग्रेस खासदार धीरज साहू सध्या चर्चेत आहेत. मात्र, धीरज हे कोणत्याही राजकीय कृतीमुळे नाही तर त्याच्या काळ्या पैशाच्या कमाईमुळे चर्चेत आहे. धीरज साहू यांच्या घरावर छापेमारी करताना आयकर विभागाने आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून नोटांची मोजणी अजूनही सुरू आहे. दरम्यान, काळ्या पैशाबाबत धीरज साहू यांचं एक जुनं ट्विट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
धीरज साहू यांचं हे ट्विट 12 ऑगस्ट 2022 चं आहे. "नोटाबंदीनंतरही देशात इतका काळा पैसा आणि भ्रष्टाचार पाहून मन व्यथित होतं. मला समजत नाही की लोक एवढा काळा पैसा कुठून जमा करतात? या देशातून भ्रष्टाचार कोणी मुळासकट उखडून टाकू शकत असेल तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे" असं धीरज साहू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेस खासदाराच्या कुटुंबाच्या मालकीच्या ओडिशा-आधारित डिस्टिलरी कंपनीविरुद्ध आयकर विभागाच्या छाप्यात जप्त केलेली रोकड पाच दिवसांच्या मोजणीनंतर 351 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. 6 डिसेंबर रोजी विभागाने छापेमारी सुरू केली होती. धीरज साहू यांच्यावर करचोरी आणि 'ऑफ-द-बुक्स' व्यवहाराचा आरोप आहे. धीरज साहूंच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यासाठी 80 जणांच्या 9 टीमचा सहभाग होता. जे पाच दिवस सतत काम करत होते.
छाप्यादरम्यान, काही ठिकाणी रोख रकमेने भरलेली 10 कपाटं सापडली, तेव्हा सुरक्षा कर्मचारी, चालक आणि इतर कर्मचाऱ्यांसह 200 अधिकाऱ्यांची आणखी एक टीम सामील झाली. मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की जप्त केलेली रोकड ओडिशातील वेगवेगळ्या बँक शाखांमध्ये जमा करण्यासाठी सुमारे 200 बॅग आणि ट्रंक वापरण्यात आल्या.