चीनला भस्म करण्याच्या आव्हानावर धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले, मौर्य यांना अशा शब्दात दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:50 PM2023-02-16T13:50:02+5:302023-02-16T13:53:52+5:30
धीरेंद्र कृष्ण शास्त्री 'हिंदू राष्ट्रा'संदर्भात बोलताना म्हणाले, सर्वच सनातन लोक याला समर्थन करत आहेत. 'ज्यांच्या शरिरात सनातनी रक्त असेल, ते खुल्या मनाने याला पाठिंबा देतील, बोलतील आणि करूनच राहतील. ज्याच्या रक्तातच समस्या असेल, ते बोलले नाही तरी फरक पडणार नाही.
'हिंदू राष्ट्रा'साठी महायज्ञात व्यस्त असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी, ही एक क्रांती असल्याचे म्हणत, यावर लवकरच संसदेतही काही होणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले ज्यांच्या रक्तात सनातन आहे, ते यासंदर्भात मागणी करतील. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या आव्हानालाही थेट उत्तर दिले. "जर एवढी शक्त असेल तर त्यांनी चीनला भस्म करावे", असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले होते.
एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री 'हिंदू राष्ट्रा'संदर्भात बोलताना म्हणाले, सर्वच सनातन लोक याला समर्थन करत आहेत. 'ज्यांच्या शरिरात सनातनी रक्त असेल, ते खुल्या मनाने याला पाठिंबा देतील, बोलतील आणि करूनच राहतील. ज्याच्या रक्तातच समस्या असेल, ते बोलले नाही तरी फरक पडणार नाही. ते म्हणाले, भारत हिंदू राष्ट्र घोषित होत आहे. क्रांती होत आहे. लवकरच या संसदेत काही तरी होणार आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षीतच लाखो अनुयायी झाले आहेत. त्यांना स्वामी प्रसाद मौर्य यांनी दिलेल्या आव्हानासंदर्भात विचारले असता, 'आम्ही सनातन धर्माचे वाहक आहोत आणि आमच्या धर्मात दडपशाही किंवा हिंसा शिकवली जात नाही. शिक्षण देणे हे आपल्या धर्माचे मुख्य धोरण आहे. त्यांना असे वाटत असेल, तर त्यांनी स्वतःच जाऊन आधी प्रयत्न करायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते स्वामी प्रसाद मौर्य? -
रामचरित मानस संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतांच्या निशाण्यावर आलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी नुकतेच, बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावरही प्रश्न उपस्थित केला होता. सोनभद्र येथे पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले होते, जर बागेश्वर धाम बाबांकडे शक्ती आहे, तर त्यांनी रोजच्या रोज भारताला त्रास देणाऱ्या चीनला बसल्या बसल्या भस्म करावे.